
मुंबई JPN NEWS - सायन येथील आनिक बस डेपोत उभ्या असलेल्या BESTच्या CNG बसना सोमवारी सायंकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीत तब्बल ८ ते १० CNG बस आगीच्या विळख्यात सापडल्याची प्राथमिक माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
मुंबई अग्निशमन दलाला ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी आगीची माहिती मिळाली. सायनमधील आरटीओ पासिंगजवळील आनिक बस डेपो, पद्मभूषण वसंतदादा पाटील मार्ग येथे ही घटना घडली.
आगीची तीव्रता लक्षात घेऊन मुंबई अग्निशमन दलाने सायंकाळी ५ वाजून ५४ मिनिटांनी Level-I Fire Call घोषित केला. घटनास्थळी अग्निशमन दलाची चार फायर इंजिन (FE), पाच जम्बो टँकर (JT), एक एअर वॉटर टेंडर (AWTT), एक क्विक रिस्पॉन्स व्हेईकल (QRV) आणि १०८ रुग्णवाहिका दाखल करण्यात आली.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलासोबत पोलीस, BEST वाहतूक विभाग तसेच संबंधित वॉर्ड कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आग ८ ते १० BEST CNG बसपुरती मर्यादित असल्याचे सांगण्यात आले आहे. CNG बस असल्याने अग्निशमन दलाने विशेष खबरदारी घेत घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या.
या आगीत कोणालाही दुखापत झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, आग पूर्णपणे विझवल्यानंतर त्याबाबत पुढील तपास करण्यात येणार आहे. आगीमुळे बस डेपो परिसरात काही काळ मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसून आले.
दरम्यान, आगीची व्याप्ती, किती बसचे नुकसान झाले आणि आगीचे नेमके कारण काय, याबाबत अधिकृत माहिती अग्निशमन दलाच्या पुढील अहवालानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


No comments:
Post a Comment