
मुंबई JPN NEWS - वाळकेश्वर येथील ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या बाणगंगा तलावातील मोठ्या संख्येने मासे मृत झाल्याच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रविवारी बाणगंगा तलावाची पाहणी केली. तलावातील पाण्याची गुणवत्ता, स्वच्छता आणि जलजीवनाच्या संरक्षणासाठी महापालिकेने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच बाणगंगेचे पावित्र्य आणि पर्यावरण जपण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन लोढा यांनी केले.
यावेळी महापालिकेच्या डी विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंखे आणि स्थानिक नगरसेवक सन्नी सानप उपस्थित होते. तलाव परिसरातील परिस्थितीची पाहणी करून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि जलजीवनाच्या संरक्षणाबाबत महापालिका प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या.
पितृपक्षाच्या काळात बाणगंगा तलाव येथे पिंडदानासह विविध धार्मिक विधी करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. या विधींमध्ये वापरले जाणारे काही पदार्थ तलावाच्या पाण्यात सोडले जात असल्याने पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असून, त्याचा जलजीवनावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर तलाव परिसरात तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.
लोढा यांनी सांगितले की, पितृपक्षाच्या काळात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन धार्मिक विधींमध्ये वापरण्यात येणारे साहित्य तलावात किंवा परिसरात टाकले जाणार नाही, यासाठी महापालिकेने आवश्यक खबरदारी घ्यावी. गेल्या गुरुवारी महापालिकेच्या वॉर्ड अधिकाऱ्यांसोबत तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून, त्यानंतर स्वच्छता आणि जलजीवनाच्या संरक्षणासाठी उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.
तलावातील दूषित पाण्यामुळे जलजीवनावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी १० कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार असून, पाण्यात ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी पंपांची संख्या वाढवण्यात येणार आहे. पितृपक्षाचा कालावधी येत्या शनिवारी संपणार असला तरी उर्वरित काळात तसेच त्यानंतरही बाणगंगा तलाव परिसरात स्वच्छता कायम ठेवण्यासाठी महापालिकेने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना लोढा यांनी दिल्या.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत वॉर्डमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाणगंगा तलाव परिसरात स्वच्छता मोहीमही राबविली होती.
पर्यावरणपूरक पिंडदान करण्याचे आवाहन -
पिंडदानाच्या विधीदरम्यान वापरण्यात येणारे काही पदार्थ तलावाच्या पाण्यात सोडले जातात. हे पदार्थ जलजीवांनी सेवन केल्यास त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने धार्मिक परंपरा जपत पर्यावरणपूरक पद्धतीने पिंडदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“बाणगंगा तलावाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांचे स्मरण आणि धार्मिक परंपरा जपत असतानाच पर्यावरणाचे संवर्धन करणे हीदेखील आपली सामूहिक जबाबदारी आहे. तलावातील जलजीवनाचे संरक्षण व्हावे, यासाठी नागरिकांनी पाण्यात तेल, तूप, गोड पदार्थ किंवा अन्य साहित्य टाकणे टाळावे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पिंडदान विधी करावेत. बाणगंगेचे पावित्र्य, स्वच्छता आणि पर्यावरण जपण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही सहकार्य करावे,” असे आवाहन कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
पितृपक्षाच्या उर्वरित कालावधीत तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने धार्मिक विधी आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment