
मुंबई JPN NEWS - मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी डॉ. आर. एन. कूपर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (HBT) ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. यावेळी दोन्ही रुग्णालयांतील विविध विभागांच्या डॉक्टरांसोबत सविस्तर बैठक घेण्यात आली. डॉक्टरांनी आपल्या अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि सूचना मांडल्यानंतर प्राधान्याच्या समस्या लवकर सोडविण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन भांदिर्गे यांनी दिले.
रुग्णांना अधिक चांगल्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने झालेल्या या बैठकीत कर्करोग रुग्णांसाठी केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करून देणे, मूत्रपिंडाच्या रुग्णांसाठी डायलिसिस बेड्सची संख्या वाढविणे आणि नवजात बालकांसाठीच्या अतिदक्षता विभागाची (NICU) निविदा प्रक्रिया वेगाने पूर्ण करणे या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने HPV लसीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
रुग्णालयांमधील मनुष्यबळाच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली. परिचारिकांची कमतरता दूर करणे, कँटीनमधील अन्नाचा दर्जा आणि स्वच्छता सुधारणे, जन्म-मृत्यू नोंदणीची प्रक्रिया नागरिकांसाठी अधिक सुलभ करणे तसेच दिव्यांग प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणी कमी करणे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशी संवाद साधताना वैद्यकीय व इतर कर्मचाऱ्यांना अधिक संवेदनशील आणि प्रभावीपणे संवाद साधता यावा, यासाठी संभाषण कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली.
बैठकीत डॉक्टरांनी विभागनिहाय अडचणी आणि दैनंदिन कामकाजातील आव्हाने मांडली. आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर वेळेत कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे हरिष भांदिर्गे यांनी नमूद केले. प्राधान्याच्या प्रश्नांवर लवकर कार्यवाही व्हावी, यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
रुग्णांना दर्जेदार उपचार मिळण्याबरोबरच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणे, रुग्णालयांतील प्रलंबित प्रश्न मार्गी लागणे आणि महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करणे हा या आढावा बैठकीचा उद्देश होता.
या बैठकीला नगरसेवक दीपक कोतेकर (प्रभाग क्रमांक ६७), नगरसेविका अंजली सामंत (प्रभाग क्रमांक ८४), वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. शैलेश मोहिते, कूपर रुग्णालय व ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे यांच्यासह दोन्ही रुग्णालयांतील विविध विभागांचे प्रमुख आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment