
पुणे JPN NEWS - स्पा सेंटर सुरू ठेवण्यासाठी ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि त्यापैकी १० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप असलेल्या साप्ताहिक ‘वंचित सामना’च्या पत्रकाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. अक्षय अरुण वाघमारे असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, पत्रकाराचे ओळखपत्र आणि होंडा कंपनीची कार असा एकूण २ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पा सेंटरचे चालक साजिद मन्सुर पेंढारी यांनी ९ ऑक्टोबर रोजी खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली होती. रहाटणी येथील ‘अर्थ स्पा सेंटर’बाबत आरोपीने डायल ११२ वर फोन करून पोलिसांना खोटी माहिती दिली आणि त्यानंतर स्पा सेंटरचा व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पैसे न दिल्यास वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध करून व्यवसाय बंद पाडण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपी वारंवार फोन करून तसेच प्रत्यक्ष भेटून पैशांची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केला. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाने सापळा रचला. ९ ऑक्टोबर रोजी रहाटणी येथील साई कॉर्नर, जगताप डेअरी चौक परिसरात दोन पंचांच्या उपस्थितीत १० हजार रुपये स्वीकारताना आरोपीला पकडण्यात आले. त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, ‘वंचित सामना’चे ओळखपत्र आणि होंडा कंपनीची कार जप्त करण्यात आली.
या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२) आणि ३०८(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी काळेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आहाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड आणि पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी केली.


No comments:
Post a Comment