
मुंबई JPN NEWS - बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना लेखी पत्र पाठवून तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
१,४६१ आशा स्वयंसेविकांसाठी मागणी -
बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सध्या एकूण १,४६१ आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. या स्वयंसेविका अल्प मानधनावर आरोग्य सेवा, लसीकरण मोहिमा आणि विविध शासकीय लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. आरोग्य यंत्रणेतील त्यांचे योगदान लक्षात घेता, दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळात त्यांनाही सानुग्रह अनुदान मिळावे, असे महापौर रितू तावडे यांनी पत्रात नमूद केले आहे.
प्रशासनाला तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश -
सर्व १,४६१ आशा स्वयंसेविकांना प्रत्येकी ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी महापौरांनी प्रशासनाकडे केली आहे. या प्रस्तावानुसार सर्व आशा स्वयंसेविकांना अनुदान दिल्यास एकूण ७३ लाख ५ हजार रुपयांचा निधी आवश्यक असेल. मात्र, महापौरांनी अनुदान देण्याबाबत निर्देश दिले असले, तरी प्रत्यक्ष मंजुरी आणि वितरणाबाबत महानगरपालिका प्रशासनाचा अंतिम निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.


No comments:
Post a Comment