
‘शाडू बाप्पा दहा दिवस – फ्लेक्समुक्त मुंबई तीनशे पासष्ट दिवस’ या संकल्पनेतून महापौरांनी ही विशेष मोहीम जाहीर केली आहे. गणेशोत्सवात पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य दिल्याप्रमाणे वर्षभर मुंबईला प्लास्टिक आणि फ्लेक्सच्या कचऱ्यापासून मुक्त ठेवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या मोहिमेला सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
घाटकोपरमधील कारवाईदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागातील अनुज्ञापन, परिरक्षण आणि अतिक्रमण निर्मूलन विभागांसह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. परिसरातील अनधिकृत फलक हटवण्याबरोबरच भविष्यात अशा प्रकारचे फलक पुन्हा लावले जाणार नाहीत, यासाठी नियमित देखरेख ठेवण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या.
मुंबईला अनधिकृत जाहिरात फलकांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी महापौरांनी महानगरपालिका प्रशासनाला पत्राद्वारे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकृत फलकांसाठी क्यूआर कोड प्रणाली अनिवार्य करणे, विनापरवाना फलक छापणाऱ्या मुद्रकांना आणि एजन्सींना काळ्या यादीत टाकणे, तसेच नागरिकांच्या तक्रारींचे जास्तीत जास्त ७२ तासांत निवारण करणे, अशा उपाययोजनांचा या धोरणात समावेश करण्याचे नियोजन आहे.
मोहिमेचा संदेश देताना महापौर रितू तावडे म्हणाल्या की, मुंबईचे सौंदर्य आणि शिस्त टिकवणे ही नागरिकांसह लोकप्रतिनिधींचीही जबाबदारी आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, राजकीय कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी आपल्या परिसरात पुढाकार घेऊन अनधिकृत फलक हटवण्यासाठी सहकार्य करावे. राजकीय भेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र आल्यास मुंबईला स्वच्छ आणि फ्लेक्समुक्त ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल, असे आवाहन त्यांनी केले.
महापौरांनी स्वतःच्या प्रभागातून मोहिमेला सुरुवात केल्यामुळे आता मुंबईतील इतर भागांतही अशाच प्रकारची कारवाई आणि नियमित देखरेख केली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


No comments:
Post a Comment