मुंबईतही सुरू होणार पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था; मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा पुढाकार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 October 2026

मुंबईतही सुरू होणार पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था; मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा पुढाकार


मुंबई JPN NEWS - पाळीव प्राण्यांची योग्य काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने मुंबईतही पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था सुरू करण्यासाठी कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला आहे. पुण्यात नुकतीच पेटकेअर एज्युकेशन अँड ट्रेनिंग संस्थेची सुरुवात करण्यात आली असून, त्याच धर्तीवर मुंबईतही अशी संस्था सुरू करण्याचे नियोजन आहे. याशिवाय, राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) पेटकेअरविषयक विशेष अभ्यासक्रम सुरू करण्याचाही विचार असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.

मुंबईतील प्रस्तावित संस्थेचे नियोजन करताना प्राणीप्रेमी आणि नागरिकांची मते जाणून घेण्यात येणार आहेत. यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यांवर गुगल फॉर्मची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी या फॉर्मद्वारे आपल्या सूचना, अपेक्षा आणि हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

पेटकेअर क्षेत्रात प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी - 
पेटकेअर एज्युकेशन अँड ट्रेनिंग (PETE) या उपक्रमातून पाळीव प्राण्यांचे आरोग्य, सुरक्षितता, संगोपन आणि कल्याण यांना प्राधान्य देणारे आधुनिक, शास्त्रीय व नैतिक पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे युवक-युवती, सध्या या व्यवसायात कार्यरत असलेले व्यावसायिक तसेच पाळीव प्राण्यांचे संगोपन करणाऱ्या व्यक्तींना विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

या अभ्यासक्रमांमध्ये पाळीव प्राण्यांना हाताळण्याचे प्रशिक्षण, डॉग वॉकिंग, पेट सिटिंग, पेट ग्रूमिंग तसेच पाळीव प्राण्यांसाठी निवास आणि देखभाल सुविधा व्यवस्थापन यांसारख्या विषयांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक माहिती न देता प्रात्यक्षिक प्रशिक्षणावरही भर दिला जाणार आहे. आधुनिक सुविधांमध्ये प्रत्यक्ष अनुभव घेऊन आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळेल. यासोबतच पाळीव प्राण्यांचे आरोग्य, संगोपन आणि कल्याण याबाबत माहिती देणारे ऑनलाइन अभ्यासक्रमही उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

कुशल मनुष्यबळासह स्वयंरोजगारालाही चालना - 
पेटकेअर क्षेत्रात योग्य प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींची गरज वाढत असताना या उपक्रमामुळे कुशल मनुष्यबळ तयार होण्यास मदत होऊ शकते. पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासाठी जागतिक दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्यासोबतच या क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

मुंबईत पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था सुरू करण्यापूर्वी नागरिकांच्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेऊन पुढील नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे प्राणीप्रेमी आणि संबंधित क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी गुगल फॉर्मद्वारे आपली मते नोंदवावीत, असे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

सूचना व हरकती नोंदविण्यासाठी गुगल फॉर्म:

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS