
मुंबई JPN NEWS - मोटारसायकलवरून येऊन नागरिकांना धक्का देत सोनसाखळी खेचून जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना पार्कसाईट पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चार गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून, दोन मोटार वाहनांसह एकूण ५ लाख ७५ हजार रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.
पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९२५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०९(४), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मोटारसायकलवरून आलेल्या दोन आरोपींनी फिर्यादीला धक्का देऊन त्यांच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने चोरले होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्कसाईट पोलिसांनी तपास सुरू केला. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल ठोंबरे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळ, एल.बी.एस. मार्ग तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.
या तपासातून शुभम सुखराम चौधरी (वय २७) आणि अजय उर्फ डब्ल्यू मुन्नीलाल गुप्ता (वय २८), दोघेही अँटॉप हिल, मुंबई यांना अटक करण्यात आली.
आरोपींकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासातून पार्कसाईट पोलीस ठाण्यातील दोन, भांडूप पोलीस ठाण्यातील एक आणि घाटकोपर पोलीस ठाण्यातील एक, असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून दोन मोटार वाहनांसह एकूण ५ लाख ७५ हजार रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोज कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपआयुक्त अभयसिंह देशमुख आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्राची कर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पार्कसाईट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अशोक लांडगे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि नितीन झाडे, अतुल ठोंबरे तसेच गुंडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई केली.
(Mumbai News, Crime News)


No comments:
Post a Comment