
मुंबई JPN NEWS - कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेले तसेच हरवलेले मोबाईल फोन शोधण्यासाठी पोलिसांनी सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपास करून तब्बल १०० मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या मोबाईल फोनची अंदाजे एकूण किंमत २२ लाख ७० हजार ६५८ रुपये आहे.
कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात मोबाईल फोन चोरीला जाणे अथवा हरविल्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी CEIR पोर्टलवरील उपलब्ध माहितीचे विश्लेषण केले. त्यानंतर मोबाईलचे IMEI क्रमांक, तांत्रिक माहिती तसेच संबंधित मोबाईलचा वापर करणाऱ्या व्यक्तींचा मागोवा घेण्यात आला.
तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांत तसेच इतर राज्यांमध्ये तपास करून एकूण १०० मोबाईल फोन हस्तगत केले. यापैकी आतापर्यंत १८ मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांमध्ये राजेंद्र पुरी, खुश साव, कृपा लोढीया, श्रेया साटम, अतुल ससाणे, प्रियांका मिस्त्री, बिनू तमंग, प्रेम गुप्ता, अझिया शेख, श्वेता शहा, संध्या पंडीत, दीपक सातवेकर, सौरभ झांगिड, केतन शेटे, ओंकार राऊत, जियालाल यादव, लक्ष्मीअप्पा कृपागिरी आणि प्रविण दुबे यांचा समावेश आहे. उर्वरित हस्तगत मोबाईल त्यांच्या मालकांना परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई उत्तर परिमंडळ-३चे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, दहिसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयराज रणवरे, कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
CEIR पोर्टलचे काम पाहणारे पोलीस उपनिरीक्षक मयुर पाटील, मपोशि काजल चौगुले, पोशि अहिरे आणि पोशि बोबडे यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून ही कामगिरी यशस्वी केली.
या कारवाईमुळे चोरीस गेलेले आणि हरवलेले मोबाईल नागरिकांना परत मिळवून देण्यास मोठी मदत झाली आहे. तसेच मोबाईल चोरी आणि हरवलेल्या मोबाईलच्या प्रकरणांचा तांत्रिक पद्धतीने तपास करण्यास पोलिसांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
(Mumbai News, Crime News)


No comments:
Post a Comment