
मुंबई JPN NEWS - घाटकोपर परिसरातील पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्गाला जोडणाऱ्या विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाचे प्रमुख काम पूर्ण झाले असून, येत्या १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी सज्ज होणार आहे. सध्या पुलावरील ध्वनीरोधक (Noise Barrier) बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यानंतर आवश्यक अंतिम कामे पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांसमवेत प्रकल्पस्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उड्डाणपूल, पोहोच मार्ग तसेच परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी परस्पर समन्वयाने आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
६५० मीटर लांबीचा दोन मार्गिकांचा उड्डाणपूल -
रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि लालबहादूर शास्त्री मार्गाला जोडणारा हा दोन मार्गिकांचा उड्डाणपूल सुमारे ६५० मीटर लांबीचा आहे. यामध्ये रेल्वे रुळांवर सुमारे १०० मीटर लांबीचा पूल, पूर्वेकडे २२० मीटर आणि पश्चिमेकडे ३३० मीटर लांबीचे पोहोच मार्ग बांधण्यात आले आहेत.
उड्डाणपुलावरून विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पदपथांवर जाण्यासाठी जोडमार्गाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय दोन्ही बाजूंच्या रेल्वे तिकीट खिडकी कक्ष, स्थानक मास्तर कार्यालय आणि जिन्यांची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. रेल्वे हद्दीत जिन्याच्या माध्यमातून पादचारी मार्ग उपरस्त्याशी जोडण्यात आला आहे.
ध्वनीरोधकाचे काम अंतिम टप्प्यात -
उड्डाणपुलाची प्रमुख बांधकामे पूर्ण झाली असून रंगकाम, दिवाबत्ती व्यवस्था, रस्ता आणि अन्य आवश्यक अंतिम कामे पूर्ण करण्यात आली आहेत. परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले ध्वनीरोधक बसविण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर परिसरातील वाहतूक प्रवाहावर परिणाम होऊ नये, यासाठी प्रमुख जंक्शन, वाहतूक दिवे, वाहनांची वर्दळ आणि पादचाऱ्यांची सुरक्षितता यांचा विचार करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन -
उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक, बॅरिकेडिंग आणि वाहतूक नियमनाची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः गर्दीच्या वेळेत उड्डाणपुलाच्या पोहोच मार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या पाहणीवेळी पोलिस उपायुक्त (वाहतूक-पूर्व विभाग) प्रदीप चव्हाण, महापालिकेचे मुख्य अभियंता (पूल) राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता (पूल) नरेश मेघराजानी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment