BMCच्या दवाखान्यांत डिजिटल पेमेंट सुविधा, ‘आपला दवाखाना’तही पॉज मशीन देण्याचे निर्देश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 October 2026

BMCच्या दवाखान्यांत डिजिटल पेमेंट सुविधा, ‘आपला दवाखाना’तही पॉज मशीन देण्याचे निर्देश


मुंबई JPN NEWS - मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना अधिक सुलभ आणि तंत्रज्ञानस्नेही सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी दिले आहेत. महापालिका दवाखाने, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ येथे रुग्ण नोंदणीसाठी ऑनलाइन पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी गुरुवारी (८ ऑक्टोबर) मालाड-मालवणी परिसरातील अंगणवाडी आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला. मालवणी-२ येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (HMIS) च्या कामकाजाची त्यांनी पाहणी केली.

रुग्ण नोंदणीची प्रक्रिया अधिक सोपी आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच महापालिकेच्या सर्व दवाखान्यांसह ‘आपला दवाखाना’ येथे पॉज मशीन उपलब्ध करून देण्याबरोबरच डिजिटल पेमेंटचा पर्याय देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

‘मिशन १००० डेज’वर विशेष भर - 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘Mission 1000 Days’ उपक्रमाच्या अनुषंगाने माता आणि बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक सेवांचा अधिक प्रभावीपणे विस्तार करण्याचे निर्देशही वर्मा यांनी दिले. या योजनांचा लाभ समाजातील तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला.

मालाडच्या मार्वे मार्गावरील अंगणवाडी केंद्राला भेट देताना त्यांनी बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची पाहणी केली. दैनंदिन आहार, मासिक पोषण आहाराचे वितरण आणि बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक नोंदी याबाबत त्यांनी माहिती घेतली. बालकांच्या आरोग्याची नोंद आणि देखरेख करण्यासाठी राज्य शासनाच्या प्रणालीद्वारे सुरू असलेल्या कामकाजाचाही त्यांनी आढावा घेतला.

आशा सेविका आणि आरोग्य सेविकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या माता-बाल आरोग्य, पोषण आणि प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक उपक्रमांची माहितीही त्यांनी घेतली. विशेषतः ‘Mission 1000 Days’ अंतर्गत गर्भधारणेपूर्व काळापासून बालकाच्या पहिल्या दोन वर्षांपर्यंत माता व बालकांचे पोषण, आरोग्य, वाढ आणि विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला.

याशिवाय पावसाळी आजार, संसर्गजन्य आजार आणि क्षयरोगाच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी क्षेत्रीय पातळीवर सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली. आरोग्य सेवा अधिक प्रभावी, सुलभ आणि तंत्रज्ञानस्नेही करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डिजिटल उपक्रमांचाही त्यांनी आढावा घेतला.

बोरिवलीतील बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्राच्या कामाचे कौतुक - 
दरम्यान, वर्मा लवंगारे यांनी बोरिवली (पूर्व) येथील महापालिकेच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्राला भेट दिली. केंद्राच्या कामकाजाची माहिती घेत त्यांनी येथील आरोग्य सुविधांचे कौतुक केले.

या केंद्रामुळे थॅलेसेमिया, बालरोगातील रक्तदोष आणि कर्करोगाने ग्रस्त असलेल्या अनेक बालकांना उपचार मिळत असून त्यांना सामान्य जीवन जगण्यास मदत होत असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. बोनमॅरो प्रत्यारोपणामुळे थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात, असा विश्वास निर्माण करण्यामध्ये महापालिकेच्या या केंद्राची भूमिका महत्त्वाची असल्याचे वर्मा लवंगारे यांनी यावेळी सांगितले. बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्राचे कार्य उल्लेखनीय आणि कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

या पाहणीवेळी पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त कुंदन वळवी, पी पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त रूपाली सरमळकर, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा पुरी यांच्यासह सहायक आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS