दोन तासांत आरोपी महिलेला अटक; ज्येष्ठ महिलेचे हिसकावलेले सोन्याचे मंगळसूत्र परत केले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 October 2026

दोन तासांत आरोपी महिलेला अटक; ज्येष्ठ महिलेचे हिसकावलेले सोन्याचे मंगळसूत्र परत केले


मुंबई JPN NEWS - ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने खेचून पळून गेलेल्या महिलेला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अवघ्या दोन तासांत ताब्यात घेत गुन्ह्याची उकल केली. पोलिसांनी चोरीला गेलेले संपूर्ण मंगळसूत्र हस्तगत केले असून, ते ३ ऑक्टोबर रोजी संबंधित ज्येष्ठ महिलेला परत करण्यात आले.

२९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता फिर्यादी बबाबाई शांताराम कदम (वय ७०) या राजमाता जिजाऊ चौक, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या दक्षिण बाजूने घराकडे जात होत्या. बस स्टॉपजवळ अंदाजे २५ वर्षांच्या एका अनोळखी महिलेने त्यांच्या गळ्यातील सुमारे एक तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने खेचून चोरी केली. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६७/२०२६, कलम ३०९(४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि राहुल पाटील, तपासी अधिकारी पोउनि जनार्दन शिंदे आणि पथकाने घटनास्थळी पाहणी करून तपासाला सुरुवात केली. घटनास्थळ वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या पुलालगत असल्याने तेथे सरकारी किंवा खासगी सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते. त्यामुळे पोलिसांनी फिर्यादीने दिलेल्या आरोपी महिलेच्या वर्णनाच्या आधारे मागाठाणे, फुलपाखरू गार्डन, देवीपाडा, साईधाम मंदिर परिसरात शोध सुरू केला.

तपासादरम्यान देवीपाडा येथील आरियाणा बिल्डिंग परिसरातून संशयित महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून चोरीस गेलेले संपूर्ण सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिक असलेल्या बबाबाई कदम या घरकाम करून उदरनिर्वाह करतात. घटनेनंतर त्या भयभीत झाल्या होत्या. मात्र पोलिसांनी तातडीने तपास करून अवघ्या दोन तासांत आरोपी महिलेला ताब्यात घेत चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. ३ ऑक्टोबर रोजी पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या हस्ते त्यांचे मंगळसूत्र त्यांना परत करण्यात आले. मंगळसूत्र परत मिळाल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त करत मुंबई पोलिसांचे आभार मानले.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने आणि सहाय्यक पोलीस आयुक्त जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब बनकर, पोलीस निरीक्षक योगेश पवार, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि राहुल पाटील, तपासी अधिकारी पोउनि जनार्दन शिंदे तसेच पोलीस अंमलदार मुजावर, सवळी, पुजारी, फोपसे, सकपाळ आणि कुटे यांनी केली.
(Mumbai News, Crime News)

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS