
मुंबई JPN NEWS - मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरात फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत १६ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी (९ नोव्हेंबर) रात्री सुमारे ९.५६ वाजता मालवणी गेट क्रमांक ८, अब्दुल हमीद मार्ग येथे घडली. दुकानातील फटाक्यांचा स्फोट झाल्याने दुकानाचे छत कोसळले. त्यानंतर बेपत्ता असल्याची माहिती असलेल्या मुलाचा मृतदेह दुकानाच्या आत आढळून आला.
मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, संबंधित वीज वितरण कंपनी, १०८ रुग्णवाहिका आणि महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तळमजल्यावरील दुकानाच्या सुमारे २० बाय ३० फूट क्षेत्रात फटाके, विद्युत वायरिंग आणि विद्युत उपकरणांपर्यंत आग मर्यादित होती. फटाक्यांच्या स्फोटामुळे दुकानाच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
आगीची माहिती मिळाल्यानंतर दुकानात एक मुलगा बेपत्ता असल्याचे समोर आले. शोध घेतल्यानंतर तो दुकानाच्या आत गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत आढळला. त्याला खासगी रुग्णवाहिकेतून महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, कांदिवली येथील बीडीबीए रुग्णालयाच्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शानवाज नियाज खान (वय १६) याला १०० टक्के भाजल्यामुळे मृत घोषित करण्यात आले.
मुंबई अग्निशमन दलाने रात्री १०.३६ वाजता आग पूर्णपणे विझवली. या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आगीच्या नेमक्या कारणाबाबत आणि घटनेच्या इतर तपशीलांबाबत पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.


No comments:
Post a Comment