
मुंबई JPN NEWS - मुंबईकरांना आगामी पावसाळ्यात पाणी तुंबणे, वाहतूक कोंडी, रेल्वे सेवा विस्कळीत होणे आणि झाडे कोसळण्याच्या घटनांचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी मुंबई महापालिकेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. पावसाळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर महापालिका, रेल्वे, वाहतूक पोलीस, बेस्ट, म्हाडा, एमएमआरडीए आणि अन्य संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिले आहेत.
पावसाळ्यापूर्वीच्या तयारीसाठी महापालिका मुख्यालयात बुधवारी (२५ नोव्हेंबर) विविध विभागांची समन्वय बैठक पार पडली. मागील पावसाळ्यात आलेल्या अडचणी आणि अनुभव लक्षात घेऊन पुढील सहा महिन्यांत ठोस उपाययोजना पूर्ण कराव्यात. पावसाळ्यात रस्ते आणि उपनगरीय रेल्वे वाहतूक सुरळीत राहण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपापसातील समन्वय वाढवावा, असे निर्देश प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिले.
कुर्ला ते मानखुर्दपर्यंत पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांवर लक्ष -
मुंबईतील अनेक रेल्वे स्थानक परिसरात पावसाळ्यात पाणी साचल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होतो. कुर्ला, शीव, चुनाभट्टी, परळ आणि मानखुर्द या परिसरांतील पाणी साचण्याच्या समस्येवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासन आणि महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने समन्वयाने आवश्यक कामे हाती घ्यावीत, असे सांगण्यात आले.
पाणी नेमके कुठे साचते, किती पाऊस झाल्यानंतर साचते आणि त्याचा निचरा होण्यासाठी किती वेळ लागतो, याची सविस्तर माहिती संकलित करण्यावर भर देण्यात आला आहे. वाहतूक पोलीस हे रस्त्यांवर पाणी साचल्याची माहिती सर्वप्रथम देणाऱ्या यंत्रणांपैकी एक असल्याने त्यांनी अचूक माहिती महापालिकेला द्यावी. त्यानुसार पर्जन्य जलवाहिन्या विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.
झाडे कोसळून रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प होऊ नये -
पावसाळ्यात रस्त्यांवर किंवा रेल्वे मार्गावर झाडे कोसळल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. अशा घटना टाळण्यासाठी उद्यान विभाग आणि रस्ते विभागाने रस्त्यालगतच्या झाडांचे सर्वेक्षण करावे. धोकादायक स्थितीतील झाडे ओळखून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. रेल्वे मार्गांवर झाडे पडून लोकल सेवा विस्कळीत होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासन आणि महापालिकेच्या उद्यान विभागाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले.
नाल्यांमध्ये कचरा जाण्यापासून रोखण्यासाठी जाळ्या -
मुंबईतील नाल्यांमध्ये कचरा टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी नाल्यांच्या बाजूला जाळ्या बसविण्याचे काम सुरू आहे. पर्जन्य जलवाहिन्या विभाग आणि संबंधित प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून विविध ठिकाणी जाळ्या बसविण्यात येत आहेत. उंच झोपडपट्टी भागांमध्येही विशिष्ट पद्धतीच्या जाळ्या बसविण्याची शक्यता तपासली जात आहे. नाल्यांमध्ये कचरा जाण्याचे प्रमाण कमी करून पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्याचा या उपाययोजनांचा उद्देश आहे.
मेट्रो स्थानकांमध्ये पाण्याच्या निचऱ्याची तपासणी -
भूमिगत मेट्रो स्थानकांमध्ये पावसाचे पाणी साचू नये, यासाठी सध्या असलेल्या निचरा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच उन्नत मेट्रो मार्ग आणि पुलांवरील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची तपासणी करून त्या सुस्थितीत असल्याची खात्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मॅनहोल दुर्घटना टाळण्यासाठी SOP लागू करण्यावर भर -
पावसाळ्यात उघड्या मॅनहोलमुळे होणाऱ्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धतीचा (SOP) काटेकोर वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय दरडप्रवण भागांमध्ये संबंधित सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही सांगण्यात आले.
सर्व यंत्रणांना सहा महिन्यांचा कालावधी -
पावसाळ्यात पाणी साचणे, शॉर्टसर्किट, घर किंवा इमारती कोसळणे, दरड कोसळणे आणि झाडे पडणे अशा विविध आपत्कालीन घटना घडतात. त्यामुळे केवळ महापालिकेने तयारी करून चालणार नाही, तर रेल्वे, वाहतूक पोलीस, बेस्ट, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, टाटा पॉवर आणि अदानी एनर्जी यांसारख्या संस्थांनीही समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अभिजीत बांगर, डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह सातही परिमंडळांचे उपायुक्त, सहायक आयुक्त, विविध विभागांचे अधिकारी तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वे व अन्य संबंधित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीबाबत सादरीकरण केले.
आगामी पावसाळ्यापूर्वी उपलब्ध सहा महिन्यांचा कालावधी नियोजनबद्ध पद्धतीने वापरून कामे पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात मुंबईकरांना पाणी तुंबणे आणि वाहतूक विस्कळीत होण्याच्या समस्यांपासून कितपत दिलासा मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.


No comments:
Post a Comment