मुंबईत विशेष स्वच्छता मोहिमेत ७७९ टन बांधकाम राडारोडा, तर ३६८ टन धूळ संकलित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 November 2026

मुंबईत विशेष स्वच्छता मोहिमेत ७७९ टन बांधकाम राडारोडा, तर ३६८ टन धूळ संकलित


मुंबई JPN NEWS - मुंबईतील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि रस्त्यांवरील धूळ तसेच बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विशेष रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम हाती घेतली आहे. २८ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत तब्बल ७७९.५५ टन बांधकाम व पाडकामाचा राडारोडा (C&D Waste), तर ३६८.९१ टन धूळ संकलित करण्यात आली आहे.

महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. मुंबईतील २६ प्रशासकीय विभागांमधील एकूण १४६ रस्त्यांवर विशेष स्वच्छता केली जात आहे.

या मोहिमेत मुंबईतील प्रमुख वाहतूक मार्गांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामध्ये वांद्रे-कुर्ला जोडमार्ग (बीकेसी कनेक्टर), सांताक्रूझ-चेंबूर जोडमार्ग (एससीएलआर), पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी जोडमार्ग (जेव्हीएलआर), घाटकोपर-मानखुर्द मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग (एस. व्ही. रोड), लिंक रोड, कार्टर रोड आणि सायन-मानखुर्द मार्गांचा समावेश आहे. याशिवाय विविध प्रशासकीय विभागांमधील धूळप्रवण रस्ते आणि परिसरांमध्येही स्वच्छता व धूळ नियंत्रणाची कामे सुरू आहेत.

रस्त्यांची सखोल स्वच्छता, झाडलोट, स्क्रॅपिंग, रस्त्यांच्या कडेला साचलेली धूळ व गाळ हटविणे, दुभाजक आणि पदपथांची स्वच्छता, कर्ब स्टोनजवळील धूळ काढणे, तसेच धूळप्रवण ठिकाणी पाण्याची फवारणी आणि मिस्टिंग अशा उपाययोजना केल्या जात आहेत. संकलित कचरा तातडीने उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यावरही भर देण्यात येत आहे. यांत्रिक स्वच्छतेसोबतच प्रत्यक्ष मनुष्यबळाचा वापर करून रस्त्यांवरील धूळ, गाळ आणि इतर कचरा हटविण्याचे काम सुरू आहे.

या मोहिमेसाठी ९६६ स्वच्छता कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी १६ जेसीबी, १९ डंपर, १९ बहुउद्देशीय मिस्टिंग मशीन, २२ मेकॅनिकल पॉवर स्वीपर, ५ वॉक-बिहाइंड ई-स्वीपर आणि ७ दुभाजक स्वच्छता यंत्रे अशा एकूण ८८ यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे.

धूळ हवेत पसरण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी धूळप्रवण ठिकाणी मिस्टिंग आणि आवश्यकतेनुसार पाण्याची फवारणी केली जात आहे. रस्त्यांची स्वच्छता आणि बांधकाम-पाडकामाचा राडारोडा हटविण्याच्या माध्यमातून मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. ही विशेष मोहीम ६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS