
मुंबई, JPN NEWS : दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिका प्रशासनाने अभिनेत्री दिया मिर्झा यांचा व्हिडिओ सोशल मीडिया खात्यावर पोस्ट केला होता. मात्र, भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी या व्हिडिओला आक्षेप घेत ट्विट केल्यानंतर महापालिका प्रशासनाने तो व्हिडिओ हटवला. साटम यांच्या ट्विटनंतर महापौर रितू तावडे यांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत प्रशासनालाच धारेवर धरले. दिया मिर्झा यांच्यावर हिंदूविरोधी असल्याचा आरोप करत 'हिंदूविरोधी तो आमच्यासाठी देशद्रोही आहे. दिया मिर्झासारख्या लोकांनी आम्हाला दिवाळी कशी साजरी करावी, हे शिकवू नये,' अशा शब्दांत महापौरांनी संताप व्यक्त केला.
साटम यांच्या विरोधानंतर व्हिडिओ डिलीट! -
दिवाळीच्या काळात प्रदूषण कमी करण्यासाठी सेलिब्रिटींच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करावे, अशा उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने दिया मिर्झा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. मात्र, आमदार अमित साटम यांनी या व्हिडिओला विरोध दर्शवत ट्विट केले. त्यानंतर प्रशासनाने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून व्हिडिओ हटवला. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशांच्या अनुषंगाने जनजागृतीसाठी तयार केलेला व्हिडिओ राजकीय विरोधानंतर प्रशासनाने मागे घेतल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.
'दिया मिर्झांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये!' -
या प्रकरणावर पत्रकार परिषदेत बोलताना महापौर रितू तावडे यांनी दिया मिर्झा यांच्यावर जोरदार टीका केली. दिया मिर्झा यांची भूमिका पहिल्यांदाच वादग्रस्त ठरलेली नाही. त्या हिंदू सणांना लक्ष्य करत असून हिंदू विचारांच्या विरोधात भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. 'फटाके वाजवावेत किंवा वाजवू नयेत, हे त्यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही दिवाळी कशी साजरी करावी, हिंदुत्व काय हे दियाने आम्हाला सांगण्याची गरज नाही,' असे महापौर म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या मुद्द्यांना दिया मिर्झा खोडून काढण्याचे काम करतात, असा आरोपही त्यांनी केला. हिंदुत्वाच्या विचारांशी आपली बांधिलकी कायम असून महायुती असेपर्यंत या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आयुक्तांना पत्र देणार; प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल
महापालिका प्रशासनाने दिया मिर्झा यांचा व्हिडिओ का पोस्ट केला, याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी महापौरांनी केली. दिया मिर्झाला काळया यादीत टाकावे असे निर्देशही महापौरांनी दिले. या प्रकरणी महापालिका आयुक्तांना पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संबंधित माहिती महापालिकेचा जनसंपर्क विभाग देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
किशोरी पेडणेकरांवरही महापौरांचा निशाणा -
पत्रकार परिषदेत महापौरांनी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावरही टीका केली. 'माझ्यावर रोज टीका करण्यासाठी त्यांना मातोश्रीवरून फोन येतात,' असा आरोप त्यांनी केला. पद टिकवण्यासाठी त्यांना माझ्यावर टीका करावी लागत असल्याचेही तावडे म्हणाल्या. उपमहापौरांना त्यांचे मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका प्रशासनाने स्वतः पोस्ट केलेला दिया मिर्झा यांचा व्हिडिओ आमदार अमित साटम यांच्या विरोधानंतर हटवण्यात आला. त्यानंतर महापौरांनीही प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठीची जनजागृती, सेलिब्रिटींचा सहभाग आणि महापालिकेच्या सोशल मीडिया धोरणावरून मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे.


No comments:
Post a Comment