मुंबईकरांसाठी दिलासादायक! ग्लोबल हॉस्पिटलमध्ये पालिकेच्या शिफारशीने मिळणार ३७ राखीव खाटा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 November 2026

मुंबईकरांसाठी दिलासादायक! ग्लोबल हॉस्पिटलमध्ये पालिकेच्या शिफारशीने मिळणार ३७ राखीव खाटा

मुंबई | JPN NEWS - 
गंभीर आजारांवरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांचा खर्च परवडत नसलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने नामनिर्देशित केलेल्या पात्र रुग्णांसाठी ३७ खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महापालिका आणि ग्लोबल हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार असून, महापौर रितू तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार होणार आहे.

ग्लोबल हॉस्पिटलमध्ये एकूण २४५ रुग्णशय्या आहेत. त्यापैकी १५ टक्के म्हणजेच ३७ खाटा महापालिकेने शिफारस केलेल्या पात्र रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या खाटांमध्ये सामान्य रुग्णशय्यांसह अतिदक्षता विभागातील (आयसीयू) खाटा, आपत्कालीन उपचार, डायलिसिस आणि आवश्यक अतिविशेषोपचार सुविधांचा समावेश असेल. त्यामुळे गंभीर आजार किंवा तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या पात्र रुग्णांना अत्याधुनिक खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या व्यवस्थेअंतर्गत पात्र रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांशी संबंधित निर्धारित सवलतीच्या दरांनुसार उपचार मिळू शकतील. विशेष म्हणजे, रुग्णांची निवड आणि रुग्णालयात पाठविण्याची प्रक्रिया महापालिकेच्या के.ई.एम. रुग्णालयामार्फत राबविण्यात येणार आहे. के.ई.एम. रुग्णालयाचे अधिष्ठाता पात्र रुग्णांची निवड, त्यांच्या वैद्यकीय गरजांचे परीक्षण आणि ग्लोबल हॉस्पिटलमध्ये संदर्भित करण्याची प्रक्रिया हाताळतील. त्यामुळे गरजू रुग्णांना उपचार मिळवताना पारदर्शकता आणि वैद्यकीय निकषांना प्राधान्य मिळणार आहे.

महापौर रितू तावडे यांनी या निर्णयाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, महापालिकेचे कायदेशीर अधिकार आणि यापूर्वीचे प्रलंबित दावे अबाधित ठेवून भविष्यातील रुग्णसेवेसाठी मार्ग खुला करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि खासगी रुग्णालयांमधील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा योग्य समन्वय साधल्यास सर्वसामान्य रुग्णांना मोठा फायदा होऊ शकतो.

खासगी रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि अतिविशेषोपचार उपलब्ध असतात; मात्र अनेकदा त्यांचा खर्च सामान्य कुटुंबांना परवडत नाही. अशा परिस्थितीत महापालिकेच्या माध्यमातून पात्र रुग्णांना राखीव खाटांचा लाभ मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होऊ शकते.

दरम्यान, राखीव खाटा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात रुग्णांसाठी उपलब्ध राहाव्यात, उपचारांसाठी रुग्णांना अनावश्यक अडथळ्यांचा सामना करावा लागू नये आणि सवलतीच्या दरांमध्ये पारदर्शकता असावी, यावर महापालिकेने नियमित देखरेख ठेवणे आवश्यक आहे, असेही महापौरांनी स्पष्ट केले. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर मुंबईतील अन्य पात्र खासगी रुग्णालयांमध्येही अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS