
मुंबई JPN NEWS - जन्मतः अवघे ७०० ग्रॅम वजन, मुदतपूर्व जन्म आणि सुरुवातीपासूनच अत्यंत नाजूक प्रकृती… अशा आव्हानात्मक परिस्थितीत जन्मलेल्या बालकाला मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांच्या अथक प्रयत्नांमुळे नवे आयुष्य मिळाले आहे. तब्बल पाच महिने नवजात शिशू अतिदक्षता विभागात (NICU) विशेष उपचार केल्यानंतर या बालकाचे वजन आता ३.३ किलोग्रॅम झाले आहे. बालकाची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
या बालकाचा जन्म २ जून २०२६ रोजी झाला. बालकाचा जन्म मुदतपूर्व झाला असून, जन्माच्या वेळी त्याचे वजन केवळ ७०० ग्रॅम होते. गर्भावस्थेदरम्यान डॉप्लर तपासणीत काही बदल आढळल्यामुळे प्रसूती केईएम रुग्णालयात करण्यात आली. या बालकाची नोंदणी महापालिकेच्या मरोळ येथील रमाबाई रुग्णालयात झाली होती.
जन्मानंतर बालकाला अत्यंत विशेष वैद्यकीय देखरेखीची गरज होती. त्यामुळे केईएम रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. उपचारादरम्यान बालकाला श्वसनासाठी विशेष वैद्यकीय सहाय्य देण्यात आले. तसेच, प्रकृतीतील बदलांवर सातत्याने लक्ष ठेवून तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले. या काळात अनेक वैद्यकीय गुंतागुंतींचा सामना करावा लागला; मात्र डॉक्टर आणि परिचारिकांच्या समन्वित प्रयत्नांमुळे बालकाची प्रकृती हळूहळू सुधारत गेली.
केईएम रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. अनिता हरिबालकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने पाच महिने या बालकावर विशेष उपचार केले. सातत्यपूर्ण निरीक्षण, आवश्यक वैद्यकीय सहाय्य आणि टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या उपचारांमुळे बालकाचे वजन ७०० ग्रॅमवरून ३.३ किलोग्रॅमपर्यंत पोहोचले. विशेष म्हणजे, आता बालकाची वाढ पूर्णपणे मातेच्या स्तनपानावर होत आहे.
अत्यंत कमी वजनाच्या आणि मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांसाठी विशेष नवजात शिशू उपचार सेवा किती महत्त्वाची आहे, हे या उदाहरणातून अधोरेखित झाले आहे. केईएम रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या जिद्द, चिकाटी आणि समर्पित सेवेमुळे एका बालकाला निरोगी आयुष्याची नवी संधी मिळाली आहे.


No comments:
Post a Comment