गोरेगाव-मुलुंड दुहेरी बोगद्याच्या कामाला वेग; ‘विहार’ मशीनकडून दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 November 2026

गोरेगाव-मुलुंड दुहेरी बोगद्याच्या कामाला वेग; ‘विहार’ मशीनकडून दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू!


मुंबई JPN NEWS - मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (GMLR) प्रकल्पातील दुहेरी भूमिगत बोगद्यांच्या कामाला आता वेग मिळणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून बांधण्यात येणाऱ्या दोन बोगद्यांपैकी पहिल्या बोगद्याचे ‘तुळशी’ या बोगदा खनन यंत्राद्वारे २७० मीटरपेक्षा अधिक खोदकाम पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या ‘विहार’ या यंत्राने ७ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही बोगद्यांचे खोदकाम आता समांतर सुरू झाले आहे.

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता हा मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा १२.२० किलोमीटर लांबीचा महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. चार टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या टप्पा ३ (ब) अंतर्गत गोरेगाव पूर्व येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड पश्चिम येथील अमर नगरदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून दुहेरी भूमिगत बोगदे बांधण्यात येत आहेत. प्रत्येकी तीन मार्गिका असलेल्या या बोगद्यांची लांबी ५.३४ किलोमीटर आहे.

‘तुळशी’ची प्रतिदिन सहा मीटर खोदकामाची गती - 
पहिल्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या ‘तुळशी’ या बोगदा खनन यंत्राचे १७ ऑगस्ट २०२६ रोजी काम सुरू झाले. त्यानंतर आतापर्यंत गोरेगावकडून मुलुंडच्या दिशेने २७० मीटरपेक्षा अधिक खोदकाम पूर्ण झाले आहे. सध्या या यंत्राची खोदकामाची सरासरी गती प्रतिदिन सहा मीटरपर्यंत पोहोचली आहे. कामातील प्रगतीनुसार ही गती टप्प्याटप्प्याने प्रतिदिन १० मीटरपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे.

‘विहार’च्या तांत्रिक चाचण्या पूर्ण; दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू - 
दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामासाठी सज्ज असलेल्या ‘विहार’ या यंत्राच्या स्थळ स्वीकृती चाचण्या (Site Acceptance Test) नुकत्याच यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या. या चाचण्यांमध्ये यंत्रणेच्या यांत्रिक, विद्युत, हायड्रॉलिक आणि नियंत्रण प्रणालींची तपासणी करण्यात आली. तसेच खोदकामासाठी आवश्यक उपकरणे आणि सुरक्षा यंत्रणांची कार्यक्षमताही पडताळण्यात आली. सर्व तांत्रिक निकष पूर्ण झाल्यानंतर ‘विहार’ला प्रत्यक्ष खोदकामासाठी सज्ज घोषित करण्यात आले. त्यानुसार ७ नोव्हेंबरपासून दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू झाले आहे.

‘विहार’ हे यंत्र अत्याधुनिक सिंगल शिल्ड अर्थ प्रेशर बॅलन्स (EPB) तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्याच्या कटर हेडचा व्यास १४.४९ मीटर, तर संपूर्ण यंत्राची लांबी ८३ मीटर आहे. यात २२ मीटर लांबीचा शिल्ड भाग आणि तीन मजली रचनेचा ६१ मीटर लांबीचा बॅकअप गॅन्ट्री विभाग आहे. या तंत्रज्ञानामुळे खोदकाम करताना बोगद्याच्या पुढील भागातील मातीचा दाब नियंत्रित ठेवता येतो. त्यामुळे जमिनीची स्थिरता राखून सुरक्षितपणे खोदकाम करणे शक्य होते.

दोन बोगद्यांतून सहा मार्गिकांची वाहतूक -
या प्रकल्पात प्रत्येक भूमिगत बोगद्याची एकूण लांबी ६,६७५ मीटर आहे. त्यापैकी ५,३४० मीटर भागाचे खोदकाम टनेल बोरिंग मशीनद्वारे करण्यात येणार आहे. उर्वरित १,३३५ मीटरमध्ये बॉक्स बोगदा, प्रवेश आणि निर्गमन मार्गिका (Ramps) तसेच शाफ्टचा समावेश आहे. दोन्ही बोगद्यांचा अंतर्गत व्यास १३ मीटर असून, प्रत्येक बोगद्यात तीन अशा एकूण सहा मार्गिकांमधून वाहतूक होणार आहे.

दोन्ही बोगदा खनन यंत्रे गोरेगाव येथून खोदकाम करत मुलुंड पश्चिमेतील अमर नगर येथे बाहेर पडणार आहेत. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान थेट भूमिगत वाहतूक मार्ग उपलब्ध होण्यास मदत होईल. संपूर्ण GMLR प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य महापालिकेने निश्चित केले आहे.

मुलुंडमध्ये ७४३ बाधित बांधकामांपैकी ६१२ निष्कासित - 
बोगद्याच्या अंतिम टप्प्यातील कामासाठी मुलुंड येथे रिट्रिव्हल शाफ्ट आणि रॅम्प उभारण्यात येत आहेत. या कामामुळे एकूण ७४३ बांधकामे बाधित होत आहेत. त्यापैकी आतापर्यंत ६१२ बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. उर्वरित १३१ बांधकामे डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत किंवा जानेवारी २०२७ च्या सुरुवातीपर्यंत हटविण्याचे नियोजन आहे. या कारवाईमुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पबाधित कुटुंबांचे (PAPs) कांजूरमार्ग येथील पुनर्वसन इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असून, या इमारतींचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.

कामाचा वेग आणि सुरक्षिततेवर भर -
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी सांगितले की, ‘तुळशी’च्या कामासोबतच ‘विहार’द्वारे दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू झाल्याने दोन्ही बोगद्यांच्या निर्मितीला समांतर गती मिळणार आहे. प्रकल्प निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. कामाचा नियमित आढावा घेऊन गरजेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ आणि तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

बोगदा खननाचे काम तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचे असल्याने कामगार आणि अभियंत्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक टप्प्यावर सुरक्षा मानकांचे पालन, आवश्यक सुरक्षा साधनांची उपलब्धता आणि संभाव्य धोक्यांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच खोदकामातून निर्माण होणाऱ्या मलब्याची वाहतूक व विल्हेवाट योग्य पद्धतीने करण्यासह प्रकल्पस्थळ आणि परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS