घाटकोपरमध्ये रॉयल अल्टेझा इमारतीला आग; तिघे जखमी, महापौर रितू तावडेंकडून घटनास्थळी पाहणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 November 2026

घाटकोपरमध्ये रॉयल अल्टेझा इमारतीला आग; तिघे जखमी, महापौर रितू तावडेंकडून घटनास्थळी पाहणी


मुंबई JPN NEWS - घाटकोपर पूर्व येथील वल्लभ बाग परिसरातील रॉयल अल्टेझा (Royal Altezza) या २१ मजली निवासी इमारतीच्या २० व्या मजल्यावर शुक्रवारी (६ नोव्हेंबर) रात्री आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने ही आग लेव्हल-२ घोषित करून शर्थीच्या प्रयत्नांनंतर नियंत्रणात आणली. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देत बचाव व मदतकार्याचा आढावा घेतला.

शुक्रवारी रात्री ८ वाजून ८ मिनिटांनी आगीची माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. सुरुवातीला लेव्हल-१ घोषित करण्यात आलेली आग रात्री ८ वाजून ५२ मिनिटांनी लेव्हल-२ घोषित करण्यात आली. आग इमारतीच्या २० व्या मजल्यावर लागल्याने अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली.

या दुर्घटनेत साईनाथ आवळे (वय ४५) हे २७ टक्के भाजले असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ऑन-ड्युटी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळाली. तसेच निरव लोढाया (वय ३४) आणि राजेश लोढाया (वय ४७) यांनाही उपचारासाठी झिनोव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून कळविण्यात आले.

आगीची माहिती मिळताच महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याची पाहणी केली आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधला. यावेळी स्थानिक आमदार पराग शाह, स्थानिक नगरसेवक सुरेश आवळे आणि नगरसेवक धर्मेश गिरी उपस्थित होते.

मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, संबंधित वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेचे स्थानिक प्रभाग कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य केले. आग नियंत्रणात आली असली तरी इमारतीमध्ये कोणी अडकले आहे का, याची खात्री करण्यासाठी अग्निशमन दलाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील तपासणी व आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS