
मुंबई JPN NEWS - अल्पवयीन मुलीला मैत्रीच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार कांदिवली पूर्व परिसरात उघडकीस आला आहे. पीडित मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला पुन्हा भेटण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, आरोपींच्या मोबाईल फोनमधून २० हून अधिक अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे. या खुलाशामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, पीडित १४ वर्षीय मुलीची ऑगस्ट २०२६ मध्ये कृष्णा नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. त्यानंतर अयान आणि कासिम या तरुणांशीही तिची ओळख झाली. त्यांच्यात नियमित संवाद सुरू होता. या ओळखीचा फायदा घेत आरोपींनी तिला भेटण्यासाठी बोलावल्याचा आरोप आहे.
६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी एका ओळखीच्या मुलीला भेटण्यासाठी जात असताना आरोपींपैकी एकाने तिला गाठले. बहाण्याने तिला कांदिवली पूर्वेतील हनुमान नगर परिसरातील एका रिकाम्या खोलीत नेण्यात आले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेदरम्यान पीडितेचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. व्हिडिओ डिलीट करण्याची मागणी केल्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
दरम्यान, १० नोव्हेंबर रोजी सोहेल नावाच्या तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडितेशी संपर्क साधला आणि घरी भेटण्यासाठी बोलावले. तिने नकार दिल्यानंतर तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यानंतर पीडितेने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
मोबाईलमधून २० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले -
समतानगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करून कृष्णा, कासिम, सोहेल आणि अयान या चार आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईल फोनमध्ये २० हून अधिक अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंचा संदर्भ, त्यामागील संभाव्य गुन्हे आणि इतर पीडित मुली आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणातील दोन १७ वर्षीय अल्पवयीन आरोपींना डोंगरी येथील निरीक्षण गृहात पाठवण्यात आले आहे. तर १८ आणि २२ वर्षे वयाच्या अन्य दोन आरोपींना दिंडोशी येथील विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) २०१२ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, मोबाईलमधील आक्षेपार्ह व्हिडिओंच्या आधारे अन्य संभाव्य पीडितांचा शोध घेतला जात आहे.
पालकांसाठी महत्त्वाचा इशारा -
मुलांशी सोशल मीडियावर होणाऱ्या ओळखी, अनोळखी व्यक्तींकडून येणारे संदेश, फोटो किंवा व्हिडिओ मागण्याचे प्रकार याबाबत पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधणे गरजेचे आहे. कोणी फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असेल, तर घाबरून न जाता विश्वासू व्यक्तीला सांगावे आणि तातडीने पोलिसांची मदत घ्यावी. अशा प्रकरणांत पीडित मुलीची ओळख उघड होईल अशी कोणतीही माहिती किंवा चित्र प्रसारित करू नये.


No comments:
Post a Comment