
पुणे | JPN NEWS -
गेल्या ११ वर्षांपासून बंद असलेल्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड या सहकारी कारखान्याला पुन्हा उभारी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कारखान्याच्या पुनर्निर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पुण्यात पार पडले. प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारकडून १,५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येत असून, यामुळे औद्योगिक उत्पादनाला चालना मिळण्यासह हजारो रोजगारांच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात पुण्यात ‘भारत टॅक्सी’ या सहकारी टॅक्सी सेवेचाही शुभारंभ करण्यात आला. चालकांनाच मालक बनविण्याच्या संकल्पनेवर आधारित या उपक्रमामुळे टॅक्सीचालकांना मध्यस्थ आणि कमिशनच्या अडथळ्यांशिवाय त्यांच्या कष्टाचा मोबदला थेट मिळण्यास मदत होईल, असे शिंदे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.
११० एकर परिसरात आधुनिक औद्योगिक प्रकल्प -
नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचा पुनर्निर्माण प्रकल्प हा केवळ बंद पडलेला कारखाना पुन्हा सुरू करण्यापुरता मर्यादित नसून आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत २०४७ या संकल्पनांना बळ देणारा उपक्रम आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. सुमारे ११० एकर क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात साखर उद्योग, डेअरी, इथेनॉल, बायोगॅस आणि जैवआधारित उद्योगांसाठी आवश्यक यंत्रसामग्रीचे उत्पादन केले जाणार आहे. या कामासाठी राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाचीही साथ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पामुळे स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल, कुशल मनुष्यबळ तयार होईल आणि ग्रामीण भागातील उद्योगांना नवी चालना मिळेल. बंद पडलेल्या सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन करून त्यांना पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे ही काळाची गरज असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले.
सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळाल्याचा दावा -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना करून अमित शाह यांच्याकडे त्याची जबाबदारी दिल्यानंतर देशातील सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल सुरू झाल्याचे शिंदे म्हणाले. सहकार क्षेत्रातील मक्तेदारी आणि अनिष्ट प्रवृत्तींना आळा घालण्यासोबतच योजनांचे लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साखर कारखान्यांचा प्राप्तिकराशी संबंधित सुमारे १० हजार कोटी रुपयांचा प्रश्न मार्गी लावून उद्योगाला दिलासा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दिवंगत अजित पवार यांची आठवण काढली.
कोल्हापूर येथे दिलेला शब्द पाळत अमित शाह यांनी नॅशनल हेवी इंजिनिअरिंगच्या पुनरुज्जीवनासाठी १,५०० कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारने संवेदनशीलता दाखवून उपाययोजनांची माहिती घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘भारत टॅक्सी’मुळे चालकांना मालकी हक्काची संधी -
‘भारत टॅक्सी’ हा सहकार क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, यात टॅक्सीचालकांना केवळ सेवा देणारे कर्मचारी न ठेवता त्यांना मालकी हक्क आणि आर्थिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. मध्यस्थ आणि कमिशनची व्यवस्था टाळून चालकांच्या उत्पन्नात वाढ करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. ‘सारथी दीदी’सारख्या उपक्रमांमधून महिलांनाही टॅक्सी व्यवसायात संधी उपलब्ध होईल आणि त्या आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
केंद्राच्या निधीवरून विरोधकांना प्रत्युत्तर -
यूपीए सरकारच्या १२ वर्षांच्या काळात महाराष्ट्राला सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा निधी मिळाला, तर एनडीए सरकारच्या १२ वर्षांच्या काळात राज्याला सुमारे १५ लाख कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडे ठामपणे मागणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक ग्रोथ इंजिन असून उद्योग, स्टार्टअप आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात राज्य आघाडीवर आहे. काहीजण राजकीय कारणांमुळे विकासकामांवर टीका करतात; मात्र चांगल्या कामाचे स्वागत करण्याची भूमिका सर्वांनी ठेवली पाहिजे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
नॅशनल हेवी इंजिनिअरिंगच्या पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे औद्योगिक उत्पादन, रोजगारनिर्मिती, सहकार क्षेत्र आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.


No comments:
Post a Comment