
नवी दिल्ली JPN NEWS - स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांना आगामी काळात महागाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मेमरी चिप्सच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे २०२६ च्या अखेरपर्यंत बहुतांश कंपन्यांच्या प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किमती ३० टक्क्यांहून अधिक वाढू शकतात. परिणामी, अनेक प्रीमियम स्मार्टफोनची किंमत एक लाख रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता बाजार संशोधन संस्था ‘काऊंटरपॉइंट रिसर्च’ने व्यक्त केली आहे.
स्मार्टफोनच्या उत्पादन खर्चात मेमरी चिप्सचा वाटा झपाट्याने वाढत आहे. २०२५ च्या पहिल्या तिमाहीत फोनच्या एकूण उत्पादन खर्चातील मेमरी चिप्सचा वाटा सुमारे १३ टक्के होता. मात्र, वर्षअखेरीस हा वाटा ४३ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांवर उत्पादन खर्चाचा मोठा दबाव निर्माण झाला आहे.
या दरवाढीमागे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील वाढती मागणी हेही महत्त्वाचे कारण मानले जात आहे. एआय डेटा सेंटर्सच्या विस्तारामुळे डी-रॅम आणि नँड मेमरी चिप्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या चिप्सचा वापर स्मार्टफोनसह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये केला जात असल्याने त्यांच्या किमती वाढण्याचा परिणाम थेट मोबाईल उत्पादनावर होत आहे.
उत्पादन खर्च वाढल्याने कंपन्यांना स्मार्टफोनची किंमत वाढवणे किंवा फोनमधील काही वैशिष्ट्ये आणि सुट्या भागांच्या बाबतीत बदल करणे असे पर्याय विचारात घ्यावे लागत आहेत. त्यामुळे आगामी काळात केवळ स्मार्टफोनच्या किमतीच वाढणार नाहीत, तर कंपन्यांच्या उत्पादन धोरणातही बदल होण्याची शक्यता आहे.
ब्रँडनिहाय दरवाढीचा विचार करता, ओप्पोच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किमतींमध्ये वार्षिक आधारावर सर्वाधिक ८२ ते ८७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर अल्ट्रा-प्रीमियम श्रेणीतील आयफोनच्या किमतींमध्ये २० ते २२ टक्क्यांची वाढ झाली आहे. शाओमी आणि सॅमसंगनेही दिवाळीनंतर निवडक स्मार्टफोनच्या किमती दोन हजार ते चार हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. यापूर्वी सॅमसंगने दिवाळीपूर्वी गॅलेक्सी एस २६ या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किमतीत १७ टक्क्यांची वाढ केली होती.
दरम्यान, स्मार्टफोनच्या किमती वाढत असताना ग्राहकांच्या अपेक्षाही बदलत आहेत. अधिक पैसे मोजल्यानंतर वेगवान प्रोसेसर, उत्तम कॅमेरा, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, मजबूत बांधणी आणि दर्जेदार विक्रीपश्चात सेवा मिळावी, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे. त्यामुळे आगामी काळात स्मार्टफोन कंपन्यांसमोर वाढता उत्पादन खर्च आणि ग्राहकांच्या अपेक्षा यांचा समतोल राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.


No comments:
Post a Comment