११ वर्षांनंतरही बाबासाहेबांचे इंदू मिलमधील स्मारक अपूर्ण; ६ डिसेंबरपूर्वी प्रगती अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS | Advertise With Us
आपल्या व्यवसायाची, ब्रँडची किंवा संस्थेची जाहिरात महाराष्ट्रातील डिजिटल वाचकांपर्यंत पोहोचवा. डिजिटल जाहिराती आणि व्यावसायिक सहकार्यासाठी संपर्क साधा.
Website Banner Ads Sponsored Content Business Promotions Digital Campaigns
JPN NEWS | Fast • Trusted • People's Voice
Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News

21 November 2026

११ वर्षांनंतरही बाबासाहेबांचे इंदू मिलमधील स्मारक अपूर्ण; ६ डिसेंबरपूर्वी प्रगती अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी


मुंबई JPN NEWS - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील इंदू मिल परिसरात उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने त्याला गती देण्यासाठी वाढीव निधी मंजूर करून निश्चित पूर्णत्वाची कालमर्यादा जाहीर करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वयक समितीचे सदस्य संजय रमेश भालेराव यांनी केली. यासंदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी, २० नोव्हेंबर रोजी उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली.

६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित तयारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत इंदू मिल स्मारकाच्या प्रलंबित कामांचा, मुख्य पुतळ्याच्या निर्मितीतील तांत्रिक अडचणींचा, खर्चवाढीचा तसेच उर्वरित कामांच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला एमएमआरडीएचे जॉईंट कमिशनर पंकज देवरे (आयएएस) उपस्थित होते.

अकरा वर्षांनंतरही स्मारक अपूर्ण -
इंदू मिल स्मारकाचे भूमिपूजन ११ ऑक्टोबर २०१५ रोजी झाले. मात्र, अकरा वर्षांचा कालावधी उलटूनही स्मारकाचे संपूर्ण काम पूर्ण होऊन ते नागरिकांसाठी खुले झालेले नाही. प्रशासनाकडून २०२५ मध्ये स्मारक पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तरीही काम पूर्ण न झाल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये नाराजी असून, वारंवार मुदतवाढ देण्याऐवजी आता निश्चित कालमर्यादा जाहीर करावी, अशी मागणी भालेराव यांनी बैठकीत केली.

पुतळ्याच्या कामातील अडचणी आणि खर्चवाढ - 
स्मारकाच्या बहुतांश कामांना पूर्णत्व आले असले, तरी मुख्य पुतळ्याच्या निर्मितीशी संबंधित तांत्रिक आणि आर्थिक प्रश्न प्रलंबित असल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. पुतळा निर्मिती, धातूंच्या वाढलेल्या किमती, शिल्पनिर्मिती प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारा अतिरिक्त खर्च यामुळे कामाला अपेक्षित गती मिळू शकलेली नाही.

शापूरजी पालोनजी कंपनी आणि शिल्पकार अनिल राम सुतार यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या पुतळा निर्मितीच्या कामासंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. मुख्य पुतळ्याच्या कामातील तांत्रिक व आर्थिक प्रश्नांवर लवकरच तोडगा काढण्याचे संकेत देण्यात आले.

चीनऐवजी भारतात पुतळा निर्मितीचा निर्णय - 
स्मारकाचा मुख्य पुतळा सुरुवातीला चीनमध्ये तयार करण्याचा विचार होता. मात्र, केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' धोरणाला प्राधान्य देत भारतातच तज्ज्ञ शिल्पकारांच्या माध्यमातून पुतळा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय शिल्पकलेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याची भूमिका प्रशासनाने घेतली. मात्र, या निर्णयानंतर पुतळ्याच्या निर्मितीतील तांत्रिक गुंतागुंत आणि खर्चवाढीमुळे काम रखडल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची आशा -
स्मारकाच्या कामातील अडचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावर होणाऱ्या आगामी बैठकीत सोडविल्या जातील, अशी आशा डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केली. एमएमआरडीएच्या अखत्यारीतील बहुतांश कामे पूर्णत्वाच्या टप्प्यावर असून, उर्वरित तांत्रिक व आर्थिक प्रश्नांवर निर्णय झाल्यानंतर स्मारकाच्या कामाला गती मिळेल, असे त्यांनी सांगितले.

मुखर्जी यांनी मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असतानाही इंदू मिल स्मारकाच्या कामाबाबत विशेष आस्था असल्याचे नमूद केले. एमएमआरडीएचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासोबत स्मारकाच्या कामासंदर्भात बैठका झाल्याची माहिती त्यांनी दिली.

जपानमध्येही इंदू मिल स्मारकाची चर्चा -
डॉ. संजय मुखर्जी यांनी आपल्या जपान दौऱ्यादरम्यान तेथील अधिकाऱ्यांनी मुंबईतील इंदू मिल स्मारकाबाबत चर्चा केल्याचा अनुभव बैठकीत सांगितला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, कार्य आणि मुंबईत उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत परदेशातही उत्सुकता असल्याचे त्यांनी नमूद केले. स्मारकाची गुणवत्ता, भव्यता आणि ऐतिहासिक महत्त्व जपून त्याचा जागतिक दर्जाचा विकास करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्मारकाची माहिती प्रसारित करणार -
६ डिसेंबर रोजी देशभरातून मुंबईत येणाऱ्या लाखो अनुयायांना इंदू मिल स्मारकाच्या संकल्पनेची आणि कामाच्या प्रगतीची माहिती मिळावी, यासाठी कटआउट्स, बॅनर्स आणि डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून माहिती प्रसारित करण्याच्या सूचना एमएमआरडीए प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक निवासस्थान राजगृह, दादर तसेच बीआयटी चाळ परिसरात स्मारकाची माहिती देणारे फलक आणि बॅनर्स लावण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर इंदू मिल परिसरातील आवश्यक व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

स्मारक केवळ पुतळ्यापुरते न राहता जागतिक ज्ञानकेंद्र व्हावे -
इंदू मिल स्मारक हे केवळ भव्य पुतळ्यापुरते मर्यादित न राहता जागतिक दर्जाचे ग्रंथालय, संग्रहालय, संशोधन केंद्र, संविधान अभ्यास केंद्र आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान बनावे, अशी भूमिका संजय रमेश भालेराव यांनी मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार, अर्थतज्ज्ञ, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि जागतिक विचारवंत होते. त्यामुळे त्यांच्या स्मारकातून संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची प्रेरणा भावी पिढ्यांना मिळाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

६ डिसेंबरपूर्वी प्रगती अहवाल आणि कृती आराखडा जाहीर करा -
स्मारकाच्या कामातील अडथळे दूर करून वाढीव निधी मंजूर करावा, मुख्य पुतळ्याच्या निर्मितीतील प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर संयुक्त बैठक घ्यावी आणि स्मारकाच्या पूर्णत्वाची निश्चित तारीख जाहीर करावी, अशी मागणी भालेराव यांनी केली.

यासोबतच ६ डिसेंबरपूर्वी स्मारकाच्या कामाचा अद्ययावत प्रगती अहवाल, मंजूर निधी, प्रत्यक्ष खर्च, शिल्लक देयके आणि प्रलंबित कामांचा तपशील सार्वजनिक करावा. पुतळा, ग्रंथालय, संग्रहालय, संशोधन केंद्र, संविधान अभ्यास केंद्र आणि अन्य सुविधांच्या पूर्णत्वासाठी स्वतंत्र कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा. आंबेडकरी संघटना व समितीच्या प्रतिनिधींना स्मारकाची प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्याची संधी द्यावी, तसेच दर पंधरा दिवसांनी छायाचित्रांसह प्रगती अहवाल प्रसिद्ध करावा, अशीही मागणी करण्यात आली.

स्मारकाच्या कामात गुणवत्ता आणि सुरक्षिततेशी तडजोड न करता तज्ज्ञांकडून तांत्रिक तपासणी करण्यावरही भालेराव यांनी भर दिला.

स्मारकाचा प्रश्न आंबेडकरी जनतेच्या अस्मितेशी जोडलेला -
इंदू मिल स्मारकाचे काम वारंवार रखडत असल्याने देश-विदेशातील आंबेडकरी अनुयायांमध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे. हा प्रश्न केवळ प्रशासकीय किंवा बांधकामापुरता मर्यादित नसून, कोट्यवधी अनुयायांच्या भावना, स्वाभिमान आणि अस्मितेशी जोडलेला आहे. त्यामुळे यापुढे आश्वासनांऐवजी निश्चित वेळापत्रकानुसार काम पूर्ण करून स्मारक जनतेसाठी खुले करावे, अशी आग्रही भूमिका संजय रमेश भालेराव यांनी मांडली.

या बैठकीला महाथेरो भदंत राहुल बोधी, समन्वयक समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, उपाध्यक्ष रवी गरुड, श्रीकांत भिसे, आशिष गाडे, तेजस्विनी रोकडे, सीताराम पवार, सदानंद मोहिते यांच्यासह विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

बैठकीत स्मारकाच्या प्रलंबित कामांवर सकारात्मक चर्चा झाली. उर्वरित तांत्रिक व आर्थिक प्रश्न सोडविण्याबाबत महानगर आयुक्तांनी आशा व्यक्त केली असून, महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्मारकाच्या माहितीचा व्यापक प्रसार करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक लवकर पूर्ण करून ते जागतिक दर्जाचे ज्ञान, संशोधन आणि सामाजिक न्यायाचे केंद्र बनवावे, हीच आंबेडकरी समाजाची अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News
📢 तुमच्या परिसरातील बातमी पाठवा!

तुमच्या भागातील समस्या, घटना किंवा महत्त्वाच्या बातम्यांचे फोटो आणि व्हिडिओ थेट JPN NEWS ला पाठवा.

WhatsApp वर बातमी पाठवा (+91 9969191363)

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS