
मुंबई JPN NEWS - राज्यातील ५० किंवा त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत आता सुलभता येणार आहे. अशा सोसायट्यांची निवडणूक विशेष सर्वसाधारण सभा (एसजीएम) घेऊन पूर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी लागणारा कालावधी कमी होऊन रहिवाशांना वेळ आणि खर्चाची बचत करता येणार आहे.
सध्या २५० किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या ई-वर्गातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीसाठी साधारण ३५ दिवसांचा कार्यक्रम राबविला जातो. मात्र, ५० किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या संस्थांची निवडणूक विशेष सर्वसाधारण सभेत घेतल्यास ही प्रक्रिया अवघ्या ९ ते १३ दिवसांत पूर्ण होऊ शकणार आहे. त्यामुळे छोट्या सोसायट्यांना निवडणुकीसाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही.
सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी अनेकदा सेवाभावी वृत्तीने संस्थेचा कारभार सांभाळत असतात. निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवारांना वारंवार एकत्र येणे, तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर संस्थेत उपस्थित राहणे यामुळे वेळ आणि खर्च वाढत होता. ही अडचण लक्षात घेऊन निवडणूक प्रक्रिया सोपी व जलद करण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम, २०१४ मधील नियम ७६-जी मध्ये सुधारणा प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तीन दिवसांच्या आत, मात्र विशेष सर्वसाधारण सभेच्या किमान सात दिवस आधी सभेची नोटीस द्यावी लागणार आहे. ही सभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल आणि सभेतच निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.
निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांच्या आत निवडणूक निर्णय अधिकारी अहवाल निबंधकांकडे सादर करतील. त्यानंतर निबंधकांनी अहवाल प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत नवीन व्यवस्थापन समिती गठित करण्याची तरतूद प्रस्तावित आहे.
या निर्णयामुळे छोट्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील निवडणुकीचा खर्च कमी होण्यास, रहिवाशांची धावपळ टाळण्यास आणि नवीन व्यवस्थापन समिती लवकर स्थापन होण्यास मदत होणार आहे. परिणामी, सोसायटीच्या दैनंदिन कामकाजातील निर्णय प्रक्रिया अधिक सुरळीत होऊन रहिवाशांच्या विविध समस्यांवर वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.


No comments:
Post a Comment