
मुंबई | JPN NEWS -
पवई तलावात ११० फूट उंचीची भव्य बुद्धमूर्ती उभारण्याच्या मागणीसाठी तथागत स्मारक समितीने राज्य सरकारला १४ एप्रिल २०२७ पर्यंत निर्णय घेण्याची मुदत दिली आहे. या मुदतीत सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास मोठे आणि निर्णायक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी दिला. या मागणीसाठी बौद्ध समाजाने संघर्षासाठी सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पवई तलावाची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हैदराबाद येथील हुसेन सागर तलावात उभारण्यात आलेल्या बुद्धमूर्तीच्या धर्तीवर पवई तलावातही भव्य पूर्णाकृती बुद्धमूर्ती उभारण्यात यावी, अशी मागणी गेल्या १२ वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, अद्याप या मागणीवर ठोस निर्णय झालेला नसल्याने समाजात नाराजी असल्याचे भीमराव आंबेडकर यांनी सांगितले.
बौद्ध-आंबेडकरी समाजाने अनेक वर्षांपासून विविध मागण्यांसाठी पाठपुरावा केला आहे. मात्र, सरकारकडून मागण्या सहजासहजी मान्य होत नाहीत, असा अनुभव असल्याचे सांगत आता या प्रश्नावर निर्णायक लढा देण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बुद्धमूर्तीमुळे मुंबईच्या पर्यटनाला चालना मिळेल -
पवई तलावातील बुद्धमूर्ती ही केवळ धार्मिक किंवा स्मारक उभारणीची मागणी नसून बुद्धांचा शांती, करुणा, मैत्री आणि समतेचा संदेश व्यापक जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, असे भीमराव आंबेडकर म्हणाले. देशातील विषमता दूर करून समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी बुद्धविचारांची आजही मोठी गरज आहे. पवई तलावातील भव्य बुद्धमूर्ती मुंबईच्या सौंदर्यात आणि पर्यटन आकर्षणात भर घालण्याबरोबरच पर्यटन महसुलालाही चालना देऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
बुद्धमूर्तीच्या मागणीला विविध सामाजिक क्षेत्रांतून पाठिंबा -
या पत्रकार परिषदेला भदंत शीलबोधी, ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे, राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार बाबुराव माने, ओबीसी नेते राजाराम पाटील, प्रजासत्ताक जनता परिषदेचे अध्यक्ष प्रबुद्ध साठे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ आणि पवई तलाव तथागत स्मारक समितीचे संयोजक गौतम साबळे उपस्थित होते.
अर्जुन डांगळे यांनी पवई तलावातील बुद्धमूर्ती मानवी प्रतिष्ठा आणि समतेसाठी प्रेरणास्थान ठरेल, असे मत व्यक्त केले. तर भदंत शीलबोधी यांनी मानवामध्ये करुणा, मैत्री आणि माणुसकी रुजवण्यासाठी बुद्धांचा विचार महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर परिसरात अनेक बौद्धकालीन लेणी आहेत. या ऐतिहासिक वारशाच्या पार्श्वभूमीवर बुद्धविचारांचा प्रसार आणि मानवी कल्याणासाठी पवई तलावातील बुद्धमूर्ती महत्त्वाची ठरेल, असे राजाराम पाटील यांनी नमूद केले. या आंदोलनात चर्मकार समाजही अग्रभागी राहील, अशी ग्वाही माजी आमदार बाबुराव माने यांनी दिली. प्रबुद्ध साठे यांनीही या मागणीला आणि संभाव्य आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
‘धम्मक्रांतीच्या भूमीत बुद्धाचा एकही भव्य पुतळा नाही’ -
महाराष्ट्रात बुद्धकालीन लेण्यांचा समृद्ध वारसा असला, तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन केलेल्या या भूमीत बुद्धांचा एकही भव्य पूर्णाकृती पुतळा नसल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी व्यक्त केली. २०३०-३१ मध्ये साजऱ्या होणाऱ्या धम्मक्रांतीच्या अमृत महोत्सवापूर्वी पवई तलावात बुद्धमूर्ती उभारण्यात यावी, अशी बौद्ध समाजाची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, १४ एप्रिल २०२७ पर्यंत राज्य सरकारने या मागणीवर ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका तथागत स्मारक समितीने घेतली आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आल्याने सरकार या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे बौद्ध समाजासह मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.


No comments:
Post a Comment