Date - 28 July 2012
कृत्रिम पाऊसाचा अपयशी प्रयोग
महाराष्ट्रातील कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्य़ांमध्ये चांगला पाऊस झाला असला तरी रायगड, ठाणे हे जिल्हे सरासरी पावसापासून बरेच मागे आहेत. विदर्भ व पश्चिम विदर्भात पाऊस सरासरी गाठत आला आहे, तर पूर्व विदर्भात बेताचाच पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात परिस्थिती अधिक भयंकर आहे. मराठवाडय़ातील पाऊस सरासरीच्या २८ टक्के अपुरा आहे, तर मध्य महाराष्ट्रात हे प्रमाण ३८ टक्क्यांनी कमी आहे. राज्यातील धरणांची स्थितीसुद्धा बरी नाही.
आता पावसाळा निम्मा संपत आला आहे. या वेळीही धरणांमध्ये केवळ २४ टक्के इतकाच साठा आहे. एरवी आतापर्यंत नद्यांना एक-दोन पूर येऊन गेलेले असतात. पण यंदा कोल्हापूर जिल्हा किंवा कोकणातील काही अपवाद वगळता नद्यांची पात्रे दुथडी भरूनही वाहिली नाहीत. गेल्या वर्षी आतापर्यंत धरणे ४६ टक्के भरली होती, तर त्याआधी २०१० साली ही आकडा ३२ टक्के होता. भारतातही कित्येक राज्यात अनेक ठिकाणी पाऊस न पडल्याने दुष्काळाची स्थिती आहे. पाऊसाचा अर्धा हंगाम संपला आहे. आता पाऊस पडेल कि नाही हे सुद्धा सांगता येणार नसल्याने सर्वत्र कृत्रिम पाऊसाची चर्चा केली जात आहे.
आपल्या देशात २००३ मध्ये सर्वप्रथम कर्नाटक सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग केला. महाराष्ट्रातही २००३ व २००४ मध्ये हा प्रयोग राबविण्यात आला. यातून अवर्षणप्रवण क्षेत्रात १५ ते २० टक्क्यांपर्यंत पाऊस होईल असा अंदाज होता, परंतु अनुकूल वातावरण नसल्याने हा प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. पहिल्या वर्षी राज्यात १५ सप्टेंबर ते १४ डिसेंबर २००३ या ९० दिवसाच्या कालावधीत हा प्रयोग झाला. त्यासाठी सुमारे ६ .७ कोटी खर्च आला.
मात्र तोपर्यंत पावसाचा निम्मा हंगाम सरला होता, त्यामुळे केवळ ३० दिवसच ढग उपलब्ध झाले. २००४ मध्ये २० जून ते १७ ऑक्टोबर या कालावधीत सुमारे १२० दिवस हा प्रयोग करण्यात आला. त्यासाठी बारामती व शेगाव येथे रडार यंत्रणा बसवली होती. त्यासाठी शासनाने १६ .२० कोटी रूपये खर्च केला. मात्र या दोन्ही वर्षी सहा मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पाडण्यात यश आले नाही. यंदा जुलैचा दुसरा पंधरवडा संपला तरीही बहूतांश भागात अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे हा प्रयोग राबविण्याची मागणी होत आहे.
मुंबईमध्ये सुद्धा या पेक्षा वेगळी परिस्थिती नाही. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात कमी पाऊस कमी पडल्याने मुंबईकरांना फक्त १३० दिवस पुरेल इतकाच पाणीपुरवठा शिल्लक राहिला आहे. मुंबईच्या आयुक्तांनीही मुंबईला पाणी पुरविणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात असा प्रयोग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी हवामान खात्याचे पावसासंबंधीचे अंदाज जाणून घेण्यात येणार आहेत. हवामान खात्याने माहिती दिल्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे कुंटे यांनी सांगितले.
२० ऑगस्ट २००९ मध्ये तानसा आणि मोडकसागर धरण क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्यात आला होता. पावसाळी ढग दृष्टिक्षेपात येताच विमानातून अवकाशात सोडियम क्लोराईडचा मारा करून पाऊस जमिनीवर आणण्यात आला होता. दोन तास हा प्रयोग चालला होता. त्यामुळे ५ ते १० मिलिमीटर पाऊस पडला होता. त्यासाठी ८ करोड रुपये खर्च करण्यात आले होते. आता पुन्हा हा कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पालिकेमध्ये जोरदार चर्चा आहे. मागील वेळेस ८ करोड रुपयांचा चुराडा करूनही पालिकेला ५ टे १० मिली मीटर पाऊस पाडता आला आहे. यामुळे पालिकेला या आधी आलेले अपयश पाहता पुन्हा नव्याने करण्यात येणारा कृत्रिम पाऊसाचा प्रयोग मुंबईकरांचे करोडो रुपये वाया घलवणार यात कोणतीही शंका नाही.
काय आहे हा कृत्रिम पाऊस
पाऊस पाडण्यासाठी ढगांमधल्या बाष्पाची क्षमता, तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग असे अनेक घटक आवश्यक असतात. यातल्या कोणत्याही एका घटकाचा असमतोल झाल्यास पावसाची शक्यता कमी होते. अशावेळी ढगांमधलं बाष्पाचं प्रमाण वाढवून ते विशिष्ट तापमानाला थंड केलं की त्याचं पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होतं. काळ्या ढगांवर विशिष्ट परिस्थितीत रसायने फवारून पाऊस पाडणे, म्हणजेच कृत्रिम पाऊस.
ढगांवर रसायने फवारून पाऊस पाडण्याप्रमाणेच गारांचा आकार कमी करण्यासाठीसुद्धा या प्रयोगांचा उपयोग केला जातो. हवेतले बाष्प एकत्र येऊन पावसाचा थेंब बनण्यासाठी एखाद्या लहानशा कणाची आवश्यकता असते. एखादा सूक्ष्म कण हा पावसाच्या थेंबाच्या केंद्राची भूमिका बजावतो. या केंद्रावर बाष्प जमा होत जाते आणि त्याचा आकार वाढला की तो पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडतो. पण ही पावसाच्या थेंबाची निर्मिती नैसर्गिकरीत्या थांबते, तेव्हा ती कृत्रिम रित्या घडवून आणावी लागते. त्यासाठी काळ्या ढगांवर सोडियम क्लोराईड म्हणजेच मिठाचे कण फवारले जातात. मिठाच्या पाणी शोषून्याच्या गुणधर्मामुळे या कणांभोवती ढगातील बाष्प जमा होते. त्याचा आकार वाढला की बाष्प पावसाचे थेंब म्हणून खाली पडते.
एकदा ही क्रिया सुरू झाली की पाऊस पडायला सुरुवात होते. काळ्या ढगांप्रमाणेच अधिक उंचीवर असलेल्या पांढऱ्या ढगांमधूनही पाऊस पाडता येतो. त्यासाठी सिल्व्हर आयोडाईड फवारले जाते. अमेरिका, इस्रायल, चीन, कॅनडा, रशिया, आफ्रिकेतील काही देश आणि युरोपीय देशांमध्येसुद्धा असे प्रयोग केले जातात. चीन येथे ओलम्पिक पूर्वी तर रशिया तही असा प्रयोग झाला होता. अमेरिका, कॅनडासारख्या ठिकाणी गारांचा आकार फार मोठा असतो. तिथेसुद्धा सोडियम आयोडाईडचे ‘कण’ फवारले की गारांची संख्या वाढते, पण त्यांचा आकार कमी होऊ शकतो.
कृत्रिम पाऊसाची आठवण
अनेकांना आता कृत्रिम पावसाच्या प्रयोगांची आठवण झाली आहे. राज्यातून अनेक जण ही मागणी करू लागले आहेत. २००३ सालच्या दुष्काळात महाराष्ट्रात असा प्रयोग करण्यात आला होता, मग आता तो का केला जात नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. ‘तहान लागल्यावर’ कृत्रिम पावसाची ‘विहीर’ खणता येईल का? याचे उत्तर शोधण्यासाठी या प्रयोगांचे विज्ञान व व्यवहार्यता लक्षात घ्यावी लागेल. अभ्यास अतिशय आवश्यक ठरतो. तो न करता कृत्रिम पावसाचा पर्याय फायदेशीर व व्यवहार्यही ठरणार नाही. त्यामुळे आताच्या वर्षी कृत्रिम पावसाचा पर्याय उरतच नाही. तो तसाच पाडायचा म्हटले तरी त्याच्या तयारीला आणि परवानग्यांना जो वेळ जाईल, तोवर पावसाळा संपून जाईल.
भविष्यात कधी तहान लागेल याचा विचार करून आताच विहीर खणायला सुरुवात करणे. ती संधी आता घेतली तर पुढच्या काळात त्याचा फायदा करून घेता येईल. खरे तर २००३ साली केलेल्या प्रयोगानंतर ही संधी होती. त्याच्या पुढच्या वर्षीसुद्धा असा पाऊस पाडण्यासाठी विमाने उडाली, पण पुढे सर्व बंद पडले. पुढच्या काळात २००५, २००६ साली प्रचंड पाऊस झाला. त्या पावसात हा प्रयोगही वाहून गेला. विमानेही उडाली नाहीत, अभ्यास तर दूरचीच गोष्ट!
अभ्यासाची गरज
पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएम) गेली तीन वर्षे ‘कायपेक्स’ नावाचा प्रयोग हाती घेतला. अभ्यास करण्यात आला. विशेषत: महाराष्ट्र व कर्नाटकमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशात हा प्रयोग केला. त्यात कृत्रिम पावसाच्या वेळी ढगांमध्ये होणारे बदल तपासण्यात आले. या प्रयोगात असे सिद्ध झाले की, पावसाची बीजे फवारल्यानंतर आपल्या परिसरातील ढगांमध्ये बदल होतात. ते जास्त काळ टिकतात म्हणजेच त्यांचे आयुष्य काही काळ वाढते. याचबरोबर या ढगांमधून पावसाचे थेंब तयार होण्याचे प्रमाण वाढते. म्हणजेच या प्रयोगांमुळे आपल्याकडेसुद्धा पावसाचे प्रमाण वाढते हे निश्चित! पण ते नेमके किती वाढते, याचा अभ्यास होऊ शकला नाही.
एक बाब स्पष्ट आहे. ती म्हणजे- कृत्रिम पाऊस पाडायचा असेल तर त्यासाठी पूर्वअभ्यास आवश्यक आहे. त्याचबरोबर रडार, खास विमाने, आवश्यक संगणक यंत्रणा, तज्ज्ञ व कुशल मनुष्यबळ यांचा समावेश असलेले स्वतंत्र युनिट उभे करावे लागेल. या प्रयोगांमुळे आपल्याकडे किती पाऊस वाढू शकतो, याचा शास्त्रीय अभ्यास सरकारने हाती घ्यावा. त्यात हे प्रयोग फायदेशीर असल्याचे आढळले तर त्यासाठी लागणारी यंत्रणा उभी करावी. उगाच वेळ आल्यावर या उपायाची आठवण काढणे काहीही उपयोगाचे नाही.
या प्रयोगामुळे पावसाच्या प्रमाणात ५ ते २० टक्के पर्यंत वाढ होऊ शकते. महाराष्ट्र्र्रात अनेक ठिकाणी कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले. परंतु एक-दोन अपवाद वगळता ११ मिमि पेक्षा जास्त पाऊस कुठेच झाला नाही. अशा प्रकारचे कृत्रिम पावसाचे प्रयोग अत्यंत खर्चिक असतात. ढग तयार होणे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असल्याने कोणत्या भागात कृत्रिम पाऊस पडणार हे अप्रत्यक्षरित्या निसर्गच ठरवतो. म्हणून कृत्रिम पावसावर पाण्यासारखा पैसा ओतण्याऐवजी नैसर्गिक पावसाचे पाणी अडवून जिरविणे, नद्यांवर धरणे बांधणे, पाणलोट क्षेत्राचा विकास करणे, वृक्षारोपण करणे अशी कामे करून पाणी टंचाईवर मात करता येईल.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३


No comments:
Post a Comment