Date 15 july 2012पालिकेतील १९ हजार रिक्त पदांकडे दुर्लक्ष
मुंबई महानगर पालिकेमध्ये अ ब क ड अशा चार वर्गामध्ये जवळपास १ लाख २० हजार कर्मचारी काम करत आहेत. यापैकी सहप्रमुख कर्मचारी अधिकारी यांनी १५ डिसेंबर २०११ रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांना दिलेल्या माहितीनुसार मागासवर्गीयांचा पालिकेमध्ये १९ हजार पदांचा अनुशेष बाकी असल्याचे कळविले आहे. ही पदे भरली जात नसल्यामुळे कित्तेक आस्थापनांमध्ये पालिकेचे कामकाज संथ गतीने चालले आहे. सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कर्मचारी भरले जात नसल्याने अधिक कामाचा बोजा पडत आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीत ३० जून २०११ रोजीच्या आकडेवारी नुसार पालिकेच्या अ ब क ड अशा चार वर्गामध्ये सरळसेवा भर्तीद्वारे ८६०४४ पदे मंजूर आहेत त्यापैकी ६५६९८ पदे भरली असून २०३४६ पदे रिक्त आहेत तर एस सी ची २११७, एस टी ची ३१०३, विजे (अ) ची १२४३, एन टी (ब) ची ९६४, एन टी (सी )ची १३७०, एन टी (डी )ची ९८२, एस बी सी ची ८६४, ओ बी सी ची ४१६६ अश्या एकूण १४८३९ पदांचा अनुशेष बाकी असल्याचे म्हटले आहे.
तर पदोन्नतीद्वारे २४१०५ पदे मंजूर आहेत त्यापैकी १४८४४ पदे भरली असून ९२६१ पदे रिक्त आहेत. एस सी ची ९१० , एस टी ची १०६९ , विजे (अ) ची ४२७ , एन टी (ब) ची ३२६ , एन टी (सी )ची ५३९ , एन टी (डी )ची ३५८ एस बी सी ची ३४३ अश्या एकूण ३९७२ पदांचा अनुशेष बाकी असल्याचे म्हटले आहे.विशेष म्हणजे सरळ सेवा व पदोन्नतीद्वारे मागासवर्गीयांचा जवळपास १९ हजार पदांचा अनुशेष बाकी असताना खुल्या वर्गातील कोणत्याही पदांचा अनुशेष बाकी नसल्याचे म्हटले आहे.
तत्कालीन पालिका आयुक्त सुबोधकुमार यांनी मुंबई महानगर पालिकेचा सन २०१२ -१३ चा अर्थसंकल्प जाहीर केला. २०११ -१२ या वर्षात २१ हजार कोटींचे बजेट २६ टक्क्यांनी वाढून २६ हजार कोटींवर गेले. या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या भरतीचा अनुशेष असल्याने काही तर्दुद केली असेल वाटले होते. परंतु पालिका आयुक्त सुबोधकुमार यांनी अर्थसंकल्प सदर केल्या नंतर पत्रकार परिषदे मध्ये मागासवर्गीयांची इतकी पदे बाकी आहेत हे चुकीचे आहेत, हे आकडे सुद्धा चुकीचे आहेत आमच्याकडे केंद्राचा एस.सी.एस.टी. आयोग आला होता त्यांनी पाहणी केली आहे पालिकेत मागासवर्गीयांची पदे रिक्त नाहीत हे एस.सी.एस.टी. आयोगाच्या निदर्शनात आणले असता त्यांची १०१ टक्के खातरी पटली आहे असे सांगितले होते.
एकीकडे पालिकेचे सहप्रमुख कर्मचारी अधिकारी मागासवर्गीयांच्या पदांचा अनुशेष बाकी असल्याचे माहिती अधिकार मध्ये लेखी माहिती उपलब्ध करून देत असताना त्याच पालिकेचे आयुक्त सुबोधकुमार यांनी असा कोणताही अनुशेष नाही असे सांगितले होते या सर्व प्रकारावरून मुंबई महानगर पालिकेच्या प्रशासनाकडून एस.सी.एस.टी. आयोगाची तसेच मुंबईकरांची व विशेष करून मागासवर्गीयांची फसवणूक करत असल्याचे सिद्ध होत आहे. मागासवर्गीयांच्या पदांच्या अनुशेषाबद्दल मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांच्याशी पत्रकार परिषदेमध्ये विचारले असता प्रभू यांनी 'रिक्त पदांच्या बाबतची माहिती व आकडेवारी मागवून ही पदे कशी भरता येतील, ही पदे भरण्यासाठी काय करावे लागेल हे पाहतो आणि कळवतो' असे सांगितले सांगितले होते. यामुळे मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी तरी लवकरात लवकर पाऊले उचलून मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु गेल्या ३ महिन्यामध्ये याबाबत कोणतीही कारवाही झाली नसल्याचे दिसत आहे.
दरम्यान आज सोमवार १६ जुलै रोजी म्युनिसिपल मजदूर कामगार संघाचे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले ,त्यांच्या पक्षाचे पालिकेमधील एकमेव नगरसेवक साब्बारेड्डी मल्लेश बोरा यांच्या सह शिष्टमंडळ पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेत आहेत या बैठकीमध्ये मागासवर्गीय कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांच्या बढती बाबत तसेच सफाई कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली जाणार आहे. परंतु पलिकेमध्ये सत्ताधाऱ्यांच्या सोबत असलेल्या आठवलेंच्या म्युनिसिपल मजदूर संघाला पालिकेमध्ये मागासवर्गीयांची १९ हजार पदे रिक्त असल्याचे माहित नसल्याचे त्यांच्या युनिअनच्या पदाधिकार्यांशी चर्चा केल्यावर समजते.
या सदरामध्ये व या आधी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमध्ये ही आकडेवारी प्रसिद्ध केली होती. आता पुन्हा मागासवर्गीयांचे राजकारण करणाऱ्या संस्था व संघटनांसाठी ही आकडेवारी माहित नसल्याने पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. आज हि रिक्त पदे भरल्यास १९ हजार मागासवर्गीय कुटुंब सुखी होतील, १९ हजार सुशिक्षित बेकार लोकांना रोजगार निर्माण होणार आहे. सर्व मागासवर्गीय संघटना, युनिअन, संस्थांनी आज पालिकेवर दबाव टाकण्याची गरज आहे. पालिकेवर सर्व बाजूने दबाव निर्माण केला तरच मागासवर्गीयांची हि पदे लवकर भरली जातील.
अजेयकुमार जाधव
मो.९९६९१९१३६३


No comments:
Post a Comment