DATE 17 JUN 20122
महापौरांचे श्रीमंतांवर लक्ष
मुंबईतील मैदानावर खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना प्राथमिक सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी शिवसेनेचे युवा नेता आदित्य ठाकरे यांनी महापौरांची भेट घेतली. "मुंबई क्रिकेट असोसिएशन'च्या आगामी निवडणुकांवर लक्ष ठेवून शिवसेनेने आदित्य ठाकरे आणि कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांना मोहिमेवर धाडले आहे. नार्वेकर यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संबंधित "न्यू हिंद'; तर आदित्य यांनी "यंग फ्रेंड क्लब' ताब्यात घेतला आहे. आता इतर क्लबकडे लक्ष वळविण्यास शिवसेनेने सुरुवात केली असून, त्याची पालिकेच्या होम पीच वरून पहिली इनिंग सुरू केली आहे.
"मुंबई क्रिकेट असोसिएशन'चे उपाध्यक्ष रत्नाकर शेट्टी यांच्या शिष्टमंडळासह आदित्य ठाकरे यांनी महापौर सुनील प्रभू यांच्या घेतलेल्या भेटीत क्रिकेटचा सराव होत असलेल्या मैदानावर प्राथमिक सुविधा पुरविण्याची मागणी करण्यात आली. तसेच क्रॉस मैदान, आझाद मैदान यासारख्या राज्य सरकारच्या मालकीच्या मैदानांवर प्राथमिक सुविधा पुरविण्यासाठी पालिकेने पाठपुरावा करावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. पालिकेच्या मालकीचे माटुंगा येथील दडकर मैदान व शिवाजी पार्कमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह अशा प्राथमिक सुविधांची गरज आहे, अशी मागणी करून यासाठी क्रिकेट असोसिएशन खर्च करायला तयार आहे, असे असे रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले.
या मागण्या करताना आझाद मैदानावर येणाऱ्या मोर्चांमुळे, तर शिवसेनेच्या सभा होतात अशा शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभामुळे येथे मैदानात येणाऱ्या लाखो लोकांकडून घाण केली जाते. असा आरोप शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे खाजगी सचिव महापौर, सभा गृह नेते यांच्या उपस्थितीत करण्यात आला. वास्तविक पाहता महाराष्ट्रा मधील गोर गरीब जनता आपल्या विविध मागण्या मान्य होत नसल्याने त्यांना त्यांचे हक्क मिळत नसल्याने आपला आवाज सरकार पर्यंत पोहचवण्यासाठी आझाद मैदान मध्ये येत असतात. उच्च न्यायालयाच्या आदेश प्रमाणे हे मोर्चे इथे येतात. मग या मोर्चेकराना सोई सुविधा पुरविणे त्याची साफसफाई करणे हे काम पालिकेचे व सरकारचे आहे. पालिका व सरकार या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याने व आपली जवाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याने मैदानामध्ये घाण पसरते. आज या गरीब व अन्याय ग्रस्त लोकांना सोई सुविधा पुरवायला, तसेच मुंबई मधील झोपडपट्ट्यामधून राहणाऱ्या गरीब लोकांना पाणी पुरवठा योग्य प्रमाणात करायला पालिका कमी पडत आहे.
असे असताना जी मुंबई क्रिकेट असोसिएसन सचिन तेंडूलकर याने १०० वी सेन्चुरी पूर्ण केल्यास १०० सोन्याचे नाणी उडवणार असे सांगते, ज्या संघटनेशी सलग्न असलेल्या संघटना सभासद होण्यासाठी लाखो रुपये घेतात, क्रिकेट शिकवण्यासाठी हजारो रुपयांची फी घेतली जाते अशा संघटना पाणी स्वस्त मिळावे म्हणून पालिकेला साकडे घालतात आणि पालीकेचे प्रमुख व मुंबईचे प्रथम नागरिक असलेले महापौर सुद्धा आपल्या युवा नेत्याला मुंबई क्रिकेट असोसिअशन च्या निवडणुकीमध्ये जिकता यावे यासाठी राज्य सरकारच्या मालकीच्या मैदानांवरील समस्या सोडविण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल. तसेच कमी दरात पाणीपुरवठा करण्यासाठी महासभेत ठराव मांडण्यात येईल. मैदानांतील समस्या सोडविण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्यात येईल असे आश्वासन देतात ही खेदजनक बाब म्हणावी लागेल.
जी संघटना आपल्याकडे भरपूर पैसा आहे हे खुले आम सांगते, आपण स्वतः पालिकेने किवा सरकारने सोई सुविधा पुविल्यास त्याचा खर्च देवू असे सांगते अशा श्रीमंतांच्या संघटनेवर आपल्या युवा नेत्याला निवडून येता यावे म्हणून पाणी कमी दरात देण्यापेक्षा आज मुंबई मध्ये कित्येक लोकांना पाण्याचे बिल भरून ही पाणी मिळत नाही, कित्येक झोपडपट्ट्यांमध्ये वेळेवर, पुरेसे, स्वच्छ पाणी मिळत नाही यासाठी महापौरांनी प्रयत्न केल्यास मुंबईकर नक्कीच संतुष्ट होतील.
अजेयकुमार जाधव
९९६९१९१३६३


No comments:
Post a Comment