DATE- 21 May 2012 क्रिकेटवर बहिष्काराची गरज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 July 2012

DATE- 21 May 2012 क्रिकेटवर बहिष्काराची गरज


DATE- 21 May 2012 
क्रिकेटवर बहिष्काराची गरज 
क्रिकेटच्या नावाखाली कितीतरी रहस्ये दडली आहेत. त्यातील एखादे गुपित बाहेर पडताक्षणी तात्पुरते बळीचे बकरे शोधले जातात. छोट्या लोकांवर नावापुरती कारवाही होते व क्रिकेट रसिकांच्या डोळ्यात फेकलेली ती धूळ होती, हे सिद्धही होते. कालांतराने दुसरे प्रकरण बाहेर पडते. पुन्हा एकदा मोठे मासे सुटतात. कुणाचा तरी बळी दिला जातो. भ्रष्टाचाराचे चक्र मात्र अविरतपणे सुरू राहते. 
मोदी यांनी सुरू केलेली ‘इंडियन प्रीमियर लीग ऊर्फ आयपीएल’ म्हणजे तर सट्टेबाज, मॅचफिक्सिंगला सरावलेले क्रिकेटपटू आणि पैशाला चटावलेले पदाधिकारी यांच्यासाठी मोठे कुरणच आहे. भ्रष्टाचाराच्या या सर्व नाड्या स्वत:च्याच हातात ठेवून मोदी यांनी नवा इतिहास घडवला होता. अब्जावधी रुपयांचा कर बुडवण्यापासून क्रिकेट बोर्डाला फसवण्यापर्यंतचे असंख्य आरोप मोदी यांच्यावर झाले. राजकारणी मित्रांच्या मदतीने मोदी परागंदाही  झाले. परंतु मोदी यांच्या सोबत क्रिकेटला लागलेली भ्रष्टाचाराची कीड मात्र गेली नाही.
 
नुकतेच  एका खासगी वाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे नवोदित क्रिकेटपटूंच्या संभाषणावरून क्रिकेटमधील भ्रष्टाचार किती तळागाळापर्यंत पोहोचला आहे हे जगापुढे आले. ज्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय नव्हे तर देशांतर्गत क्रिकेट कारकीर्दही फुलायची आहे, त्यांनी स्वत:च्या कौशल्याचा बाजार मांडला होता. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना तुरुंगवास झाल्याची घटना ताजी असतानाही, तोच प्रमाद करण्याचे धाडस या खेळाडूंनी केले. संभाव्य परिणामांचीही त्यांना भीती वाटली नाही. 
 
याचे कारण म्हणजे समाजात भिनलेला भ्रष्टाचार. खरे तर विविध स्तरांवर होणा-या भ्रष्टाचाराचेच प्रतिबिंब आपण क्रिकेटमध्ये पाहत आहोत. एक पैसादेखील मानधन न मिळण्याच्या काळातही क्रिकेटने आपले पावित्र्य जपले होते. आज पैशाच्या राशीत लोळणा-या क्रिकेटपटूंना मिळतो आहे त्यापेक्षा अधिक पैसा हवा आहे. या प्रवृत्तीला लगाम घालण्याऐवजी क्रिकेट बोर्डानेच आयपीएल सामन्यांचे औचित्य साधून पार्ट्या आयोजित करण्यास मुभा दिली. या पार्ट्यांना येणारे कोण होते. ‘एस्कॉर्ट्स’च्या नावाखाली कोणते उद्योग चालायचे? या पार्ट्यांमध्ये क्रिकेटपटूंशी कुणाकुणाला जवळीक साधायची होती? याचा भारतीय क्रिकेट बोर्डाने कधीच विचार केला नाही. किंबहुना त्यांनी हेतुपुरस्सर या गोष्टींकडे डोळेझाक केली असेच म्हणावे लागेल.‘टू जी’ घोटाळा चव्हाट्यावर आल्यानंतर सरकारने जशी ए. राजा यांची सखोल चौकशी करण्याची तयारी दर्शवली, तशी तयारी आता बीसीसीआयने दाखवली पाहिजे. 
 
करारापेक्षा अधिक पैसे घेणारा खेळाडू जसा दोषी आहे, तसेच त्या खेळाडूंना ठरल्यापेक्षा अधिक पैसे देणारी संघमालकही दोषी आहेत. खेळाडूंवर जर त्या गुन्ह्यासाठी कारवाई होऊ शकते, तर मग पैसे देणा-या संघावर का नाही? या प्रश्नांचे उत्तर शोधून ते आम जनतेसमोर ठेवण्याची जबाबदारी आता भारतीय क्रिकेट बोर्डाची आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालामध्ये आम्ही भारतासाठी खेळत नाही आम्ही भारताचा झेंडा बोधचिन्ह वापरात नाही आमची स्वायत्त संस्था आहे आमचा संघ भारताचा नव्हे तर बी सी सी आय चा संघ आहे असे सांगणाऱ्या बी सी सी आय कडून या उत्तराची अपेक्षा कमी असली तरी अशा क्रिकेटवर जनतेनेच बहिष्कार घालण्याची गरज आहे.
 
अजेयकुमार जाधव 
मो.९९६९१९१३६३ 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS