पालिकेच्या प्रतीक्षा यादीवरील ११२० कामगाराना
नोकरीत सामावून घेण्याची मागणी
नोकरीत सामावून घेण्याची मागणी
प्रतीक्षा यादीवर असलेले ११४५ कामगार गेल्या १० वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घ्या, अशी मागणी या यादीतील कामगारांनी केली आहे.
राष्ट्रीय जनरल कामगार संघाने प्रतीक्षा यादीतील या कामगारांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यासाठी आयुक्त कुंटे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. पालिकेच्या सीपीए १२२ च्या परिपत्रकानुसार १९९८ मध्ये चतुर्थ श्रेणीतील रिक्त पदांसाठी भरती करण्याकरिता अर्ज मागविण्यात आले. एकूण १८०० कर्मचारी पात्र ठरले; त्यापैकी ६८० जणांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले. उर्वरित ११२० जणांना प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आले आहे. त्याला आता १० वर्षे झाली.
या कामगारांना नोकरीची हमी द्यावी आणि त्यांना नोकरीत सामावून घ्यावे यासाठी कामगारांचे शिष्टमंडळ आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेणार असल्याची माहिती संघाचे चिटणीस सूर्यकांत इंगळे यांनी दिली. हे कामगार पात्र आहेत. नव्याने भरती करण्यापेक्षा त्यांना सामावून घ्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. वय उलटून गेल्यामुळे अनेक पात्र उमेदवारांना अपात्र ठरविले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तसा निर्णय प्रशासनाने घेऊ नये, असा आग्रह संघाने धरला आहे. या कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


No comments:
Post a Comment