डॉ. आंबेडकर स्मारकाबाबत पंतप्रधानांचे आश्वासन
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व असामान्य असून, त्यांच्या महानतेला साजेसे स्मारक इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येईल, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज (शनिवार) येथे सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखालील एका सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राजभवन येथे पंतप्रधानांची भेट घेतली आणि या स्मारकासाठी इंदू मिलच्या भूखंडाच्या हस्तांतराची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, अशी मागणी केली.
भूखंड हस्तांतर प्रक्रिये संदर्भातील प्रस्ताव पूर्वीच पाठविण्यात आला असून, केंद्र सरकारमधील विविध मंत्रालयांनी या प्रस्तावाच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे उभे केले आहेत. पंतप्रधानांनी त्यात हस्तक्षेप करून संबंधित मंत्रालयांना तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही मुख्यमंत्री चव्हाण यांनी केली आहे.या भूखंडावर होणारी स्मारकाची उभारणी सरकारतर्फेच करण्यात येणार असल्याने, त्याचा व्यापारी कारणांसाठी उपयोग होणार नाही, याची हमीही चव्हाण यांनी पंतप्रधानांना दिली आहे, यावर, आपण निश्चिंत राहावे. दिल्लीस पोचल्यानंतर वस्त्रोद्योग आणि पर्यावरण मंत्रालयांशी चर्चा करून आपण हे अडथळे दूर करू, असे आश्वासन पंतप्रधानांनी शिष्टमंडळाला दिले.
या शिष्टमंडळात मुख्यमंत्री चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मंत्री नसीम खान, वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचे खासदार एकनाथ गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, सचिन अहीर आणि लक्ष्मण ढोबळे यांच्यासह आनंदराज आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई आणि गंगाधर गाडे यांचाही समावेश होता.


No comments:
Post a Comment