दंगलीच्या वेळी संयम बाळगल्याने हिंसाचाराची मोठी घटना थोपविली -पोलिस आयुक्त अरूप पटनायक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 August 2012

दंगलीच्या वेळी संयम बाळगल्याने हिंसाचाराची मोठी घटना थोपविली -पोलिस आयुक्त अरूप पटनायक



दंगलीच्या वेळी संयम बाळगल्याने 
हिंसाचाराची मोठी घटना थोपविली-पोलिस आयुक्त अरूप पटनायक 
आझाद मैदान येथे झालेल्या दंगलीच्या वेळी शस्त्रसज्ज असलेले पोलिस रायफलीच्या ट्रिगरवर बोट ठेवूनच होते; मात्र गोळीबार होऊन मोठ्या प्रमाणावर होणारी जीवित हानी टाळण्याकरिता त्यांनी संयम बाळगणे महत्त्वाचे होते, अशा शब्दांत आझाद मैदान हिंसाचाराच्या दिवशी पोलिसांनी बाळगलेल्या कमालीच्या संयमाचे पोलिस आयुक्त अरूप पटनायक यांनी समर्थन कले. अवघ्या 37 मिनिटांत हिंसाचाराची मोठी घटना थोपविल्याचेही पटनायक यांनी या वेळी सांगितले.
    आसाम आणि म्यानमार येथे अल्पसंख्याक समाजावर झालेल्या हिंसाचाराचे भोग मुंबईकरांना भोगावे लागू नयेत असे माझे मत होते. याआधी मुंबईत 1992 ला उसळलेल्या जातीय दंगली आपण स्वतः पाहिल्या आहेत. या वेळी वांद्रेसारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी आपण उपायुक्त म्हणून काम केले आहे. आझाद मैदानात उसळलेल्या अनागोंदीच्या वेळी अल्पसंख्याकांकडून पोलिसांना होत असलेल्या बेदम मारहाणीच्या वेळी संपूर्ण पोलिस दलातील वातावरण गरम झाले होते. या ठिकाणी तब्बल 700 शस्त्रधारी पोलिस होते. नजरेसमोर पोलिसांवर होत असलेली दगडफेक आणि मारहाण पाहून पोलिस त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांतून निदर्शनाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांवर बेछूट गोळीबार करू शकले असते. तो होऊन मुंबईत भीषण दंगल उसळू नये यासाठीच संयम बाळगल्याचे पोलिस आयुक्त म्हणाले. आपण स्वतः तेथील व्यासपीठावर जाऊन उपस्थितांना या दंगलीची आठवण करून दिली. तसेच ज्यांचा काहीही संबंध नाही, अशांना जाण्याची परवानगी दिली. दुपारी 3 वाजून 17 मिनिटांनी उसळलेला हिंसाचार पोलिस दलाच्या संयमामुळे 3 वाजून 40 मिनिटांनी थांबल्याचेही त्यांनी सांगितले.
     या ठिकाणी हजारोंचा जमाव गोळा होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो याचा विशेष शाखेकडून अहवाल मिळाला होता. त्यामुळेच या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली. कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त रजनीश सेठ, अतिरिक्त पोलिस आयुक्त, चार पोलिस उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी तेथे उपस्थित होते अशी माहितीही त्यांनी दिली. 
निरपराध्यांना सोडून देणार निदर्शनांच्या ठिकाणी आझाद मैदानात बसलेल्या निदर्शकांनी नाही, तर मैदानाबाहेर असलेल्या जमावाने या हिंसाचाराला सुरुवात केली. हा जमाव कसा आला, कोणी आणला, याचा सखोल तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या हिंसाचारासंबंधी पोलिसांकडे आवश्‍यक पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे जाळपोळ व दगडफेक करणाऱ्या निदर्शकांवर कठोर कारवाई होणारच; मात्र ज्यांनी हिंसाचारात भाग घेतलेला नाही; मात्र केवळ घटनास्थळावर पोलिसांना सापडल्यामुळे ज्यांच्यावर कारवाई झाली, अशा दोघा-तिघांना कलम 169 नुसार सोडून देण्यात येणार असल्याचेही वक्तव्य पटनायक यांनी केले. आझाद मैदानात झालेला हा हिंसाचार पोलिस दलासाठी मिळालेला एक धडा असल्याचेही पटनायक या वेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS