पंतनगरमध्ये 3 महिला पोलिसांना मारहाण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 September 2012

पंतनगरमध्ये 3 महिला पोलिसांना मारहाण

पंतनगरमध्ये 3 महिला पोलिसांना मारहाण
मुंबई : पोलिसांवरच हात टाकण्याचे प्रकार सध्या मुंबईत सुरू आहेत. मालवणी पोलीस ठाण्यात पोलीस अधिकार्‍याला मारहाण झाल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच बुधवारी पंतनगर पोलीस ठाण्यात तीन महिला पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत पोलीस हवालदाराच्या पत्नीचाच हात आहे. 

घाटकोपर (पू.) येथील लक्ष्मी नगर या झोपडपट्टीतील एका झोपडय़ावर न्यायालयाच्या आदेशाने कारवाई करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान जिल्हाधिकारी स्वत: फौजफाटय़ासह हजर होते. ही कारवाई पार पडल्यानंतर बुधवारी कारवाई करण्यात आलेल्या झोपडय़ाची मालकीण मंगल बनपट्टे हिच्यासह गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार रमेश कदम यांच्या पत्नी राजश्री, मुलगी रोहिणी व सागर बनपट्टे हे चौघेजण पंतनगर पोलीस ठाण्यात दाखल होऊन त्यांनी जिल्हाधिकार्‍यांविरुद्ध तक्रार नोंद करून घेण्याची मागणी पोलिसांकडे केली. मात्र झोपडीवरील कारवाई न्यायालयाच्या आदेशाने झाली असल्याने पंतनगर पोलिसांनी फिर्यादी महिलांना न्यायालयात दाद मागण्यास सांगून पोलीस ठाण्यातून बाहेर जाण्यास सांगितले. त्या वेळी पोलिसांशी हुज्जत घालणार्‍या या महिलांना पोलीस ठाण्याबाहेर काढण्यासाठी आलेल्या पंतनगर पोलीस ठाण्याच्या तीन महिला पोलीस शिपायांना त्या महिलांनी धक्काबुक्की, मारहाण केली. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी राजश्री कदम, मंगल बनपट्टी, सागर बनपट्टी व रोहिणी कदम यांच्याविरुद्घ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. गुरुवारी न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS