बेस्ट बसेस वाहतूक कोंडीतून सुटणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट बसेस वाहतूक कोंडीतून सुटणार

Share This
बेस्ट बसेस वाहतूक कोंडीतून सुटणार
मुंबईत प्रथमच बीआरटीएसचा पर्याय उपलब्ध होणार

मुंबई : मुंबईतील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली असून यावर 'बीआरटीएस' (बस रॅपिड ट्रन्झिट सिस्टीम) योजना हाच पर्याय असल्याने ही योजना मुंबईत लागू करावी, अशी मागणी बेस्ट समितीत अनेक वेळा झाली होती. घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्याचे रुंदीकरण करताना या 'सर्व्हिस रोड'चे काँक्रीटीकरण केले जाणार असून हे होत असताना मुंबईत प्रथमच बीआरटीएस अर्थात बेस्ट बसेसची जलगतीने वाहतूक या प्रकल्पांतर्गत स्वतंत्र मार्गिका निर्माण करणे आणि उपयोगिता सेवांकरिता स्वतंत्ररीत्या दोन जमिनीखालील आरसीसी वाहिन्या यांचाही या कामामध्ये समावेश करण्यात आला असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिली.

भाजपाचे गटनेते दिलीप पटेल हे गेल्या अनेक वर्षापासून बेस्ट समितीत बेस्ट सेवा जलगतीने व्हावी यासाठी बीआरटीएस (बस रॅपिड ट्रन्झिट सिस्टीम)ची मागणी करीत होते. घाटकोपर- मानखुर्द जोडरस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे अखेर ही योजना मुंबईत कार्यान्वित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या या योजनेसाठी एक रोड निश्चित केला असला तरी संपूर्ण मुंबईत अशाप्रकारे बेस्ट बससेवेसाठी बीआरटीएसच्या माध्यमातून विशेष मार्गिका उपलब्ध झाल्यास सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढून रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल.

घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी विनंती महामार्ग पोलीस आणि वाहतूक पोलीस यांनी पालिकेकडे केली होती. या मार्गावरील वाहनांची संख्या लक्षात घेऊन या रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय घेतल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages