‘फरार’ कृपांच्या हस्ते सुशीलकुमारांचा सत्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘फरार’ कृपांच्या हस्ते सुशीलकुमारांचा सत्कार

Share This

‘फरार’ कृपांच्या हस्ते सुशीलकुमारांचा सत्कार

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी फरार घोषित केलेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार कृपाशंकर सिंह यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा विमानतळावर जंगी सत्कार केला.

सिंह यांच्यावर बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याचा आरोप असून त्यांच्या घराच्या झडतीत बेकायदा शस्त्र सापडल्याने आर्म्स अॅक्टखाली ते पोलिसांना हवे आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद सिंह यांनी गमावले. मात्र तरीही राहुल गांधी यांचा मुंबई दौरा असो की मुंबई पोलिस आयुक्तांची इफ्तार पार्टी त्यामध्ये हजेरी लावून सिंह यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची यापूर्वीच पंचाईत केली होती. मात्र रविवारी शिंदे यांच्या सत्काराचा कार्यक्रम सिंह यांनी घोषित केला तेव्हा शिंदे यांच्या काही समर्थकांनी हा सत्कार स्वीकारू नये असा आग्रह धरलाहोता. पण यापूर्वीच कार्यक्रम जाहीर केला असल्याने सत्कार स्वीकारण्याची विनंती सिंह यांनी शिंदे यांना केल्याचे शिंदे समर्थकांकडून समजते.

शिंदे यांचे रविवारी विमानतळावर आगमन झाले तेव्हाही गेट क्र. ५ मधून बाहेर पडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र १६ आमदार शिंदे यांच्या स्वागतासाठी हजर असल्याने त्यांचा नाईलाज झाला ,असे शिंदे यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. यावेळी मंत्री वर्षा गायकवाड आमदार जगन्नाथ शेट्टी अमीन पटेल व कालिदास कोळंबकर हेच अनुपस्थित होते. सिंह यांच्या निमंत्रणावरून आम्ही हजर राहिलो नाही तर शिंदे यांच्यावरील प्रेमापोटी हजर राहिलो असे काही उपस्थित आमदारांनी सांगितले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत कराडहून शिंदे मुंबईत आले. मात्र मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला हजर राहायचे टाळले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages