सुगंधी दुधाची सुरवात केलेल्या शाळेतच योजना बंद! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 September 2012

सुगंधी दुधाची सुरवात केलेल्या शाळेतच योजना बंद!


सुगंधी दुधाची सुरवात केलेल्या शाळेतच योजना बंद!
मुंबई : गेल्या दोन वर्षापासून बंद असलेले 'सुगंधी दूध' पालिका विद्यार्थ्यांना 27 ऑगस्टपासून पुन्हा सुरू करण्यात आले. महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते 27 ऑगस्टला पालिकेच्या शिवडी येथील प्रबोधनकार शाळेत सुगंधी दुधाचे वाटप करून उद्घाटन करण्यात आले होते, मात्र याच शाळेत 14 सप्टेंबरला चार विद्यार्थ्यांना दूधबाधा झाल्यामुळे दूध वितरण बंद केले गेले.

या विषयावर काँग्रेस नगरसेविका प्रियतमा जाधव यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून विषयाला वाचा फोडल्यानंतर शिक्षण समिती सदस्यांनी योजनाच बंद करण्याची मागणी केली, मात्र हा निर्णय आपल्या नेत्यांचा असल्याने दूध बंद करणे चुकीचे असून यामुळे विद्यार्थीही दुधापासून वंचित राहतात, असे शिक्षण समिती अध्यक्ष खरटमोल यांनी स्पष्ट करत सदस्यांच्या मागणीला फाटा दिला.दोन वर्षापूर्वी दूधबाधा झाल्यामुळेच सुगंधीत दूधवाटप बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यानंतर केईएमचे अधिष्ठाता डॉ. संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कमिटीने सुगंधी दूधपुरवठा पुन्हा सुरू करण्यास हिरवा कंदील दिल्यानंतर 27 ऑगस्टपासून महापौरांच्या हस्ते दूध वितरण करून उद्घाटन केले. त्याच शाळेतील विद्यार्थ्यांना दूधबाधा झाल्याने दूध वितरण बंद करावे लागले.शिवडी येथील शाळेत दूधबाधा झाल्यानंतर या दुधाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असल्याचे उपायुक्त अरविंद हिरे यांनी सांगितले, मात्र दुधात दोष नसून त्या विद्यार्थ्यांनी मांस खाल्ले असावे, त्यांची झोप पूर्ण झाली नसावी, सकाळी पोट साफ झाले नसावे, या कारणांमुळेही उलटी, जुलाब होऊ शकतात, असे हिरे यांनी स्पष्ट केले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS