मनसे नगरसेवकाविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यावर मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 September 2012

मनसे नगरसेवकाविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यावर मोर्चा

मनसे नगरसेवकाविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यावर मोर्चा
मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांच्याविरोधात विनयभंग आणि "ऍट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पक्ष आणि अन्य संघटनांनी केली होती. त्या मागणीची पूर्तता न झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. १७ सप्टेंबर) सायंकाळी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या वेळी पोलिसांना "मनसे गुलाम' हा किताब दिला जाणार आहे .

इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याच्या मागणीची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीरपणे खिल्ली उडवली होती. त्या वक्तव्यांच्या निषेधार्थ रिपाइं कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या घरावर मोर्चा काढला होता. हा मोर्चा शिवसेना भवन येथे अडवण्यात आला होता. त्या वेळी मनसे नगरसेवकांनी मोर्चातील विद्यार्थी-विद्यार्थिनींवर हल्ला केला, तसेच जातीवाचक शिवीगाळ केली, असा आरोप ज्योती बडेकर यांनी केला आहे. याप्रकरणी मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर विनयभंग आणि "ऍट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु त्या घटनेला एक महिना उलटल्यानंतरही देशपांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. म्हणून सोमवारी सायंकाळी 5 वाजता शिवाजी पार्क पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चात मराठी भारती, विद्यार्थी भारती, भारिप, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, बहुजन समाज पार्टी, इंडियन सोशल मूव्हमेंट, भारतीय जनमुक्ती आंदोलन, प्रजासत्ताक भारती, समता विचार युवा प्रतिष्ठान, रिपब्लिकन पॅंथर, माता रमाबाई महिला मंडळ, विद्यार्थी क्रांती दल आदी संघटना सहभागी होणार आहेत. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ज्योती बडेकर, नागसेन माला, किशोर कर्डक आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS