इंदू मिलसाठी रिपब्लिकन पक्षाचे संसदेवर आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 November 2012

इंदू मिलसाठी रिपब्लिकन पक्षाचे संसदेवर आंदोलन


नवी दिल्ली : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण जमीन 5 डिसेंबरपर्यंत दिलीच पाहिजे, या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी येथील जंतरमंतर ते संसद भवनापर्यंत प्रचंड मोर्चा काढण्यात आला. या वेळी झालेल्या तीव्र आंदोलनात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. संतप्त रिपब्लिकन कार्यकत्र्यांनी संसदेचे सुरक्षाकडे तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. देशभरातून आलेल्या रिपाइं कार्यकत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने संसद भवन परिसर दणाणून गेला.

पंतप्रधानांनी तत्त्वत: मान्यता देऊन वर्ष होत आले, मात्र इंदू मिलची जमीन डॉ. आंबेडकरांच्या स्मारकास हस्तांतरित झाली नाही. याबाबत केंद्र सरकार गंभीर नाही. वस्त्रोद्योग मंत्रालयास याचे सर्व अधिकार असतानाही या प्रश्नाचे भिजत घोंगडे ठेवल्यामुळे आनंद शर्मा यांची केंद्रीय मंत्रिमंडळाकडून हकालपट्टी करा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. 5 डिसेंबरपर्यंत इंदू मिलचा निर्णय न झाल्यास 6 डिसेंबरला इंदू मिलचा ताबा घेणार म्हणजे घेणारच. या आंदोलनात हजारो तरुण बलिदान देण्यास तयार आहेत. या वेळी संपूर्ण देशात आंदोलन पुकारण्यात येईल.

वाढते दलित-आदिवासींवरील अत्याचार रोखावेत, भूमिहीनांना जागा द्यावी, थेट परकीय गुंतवणुकीला विरोध आदी मागण्याही या मोर्चात करण्यात आल्या. आठवलेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना भेटले. इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर स्मारकास शिवसेना-भाजपाचा पाठिंबा आहे. शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकास रिपाइंचा पाठिंबा राहील, असेही आठवलेंनी जाहीर केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS