बाळासाहेबांचे स्मारक महापौर निवासातच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 December 2012

बाळासाहेबांचे स्मारक महापौर निवासातच


मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मारकाच्या वादावर तोडगा निघण्याची शक्यता असून मुंबईच्या महापौर निवास येथे शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. शिवाजी पार्क मैदानात ज्या ठिकाणी शिवसेनाप्रमुखांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला, त्या ठिकाणी एक स्मृतिस्तंभ उभारला जाण्याची शक्यता असल्याचे समजते.

स्मारकाबाबत शिवसेना आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे जी भूमिका घेतील त्याला पाठिंबा देण्याचे भारतीय जनता पार्टीने ठरविले आहे. त्यामुळे या स्मारकाचा वाद चिघळला जाण्याची शक्यता होती; पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या विषयावर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि यावर तोडगा काढण्याचे ठरले, असे सूत्रांनी सांगितले. शिवसेनाप्रमुखांवर अंत्यसंस्कार झाले, त्या स्थळापासून मुंबईच्या महापौरांचे निवास हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे महापौर निवासाच्या जागेत तसेच त्याला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक बनविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तयारी दर्शविली. त्याच वेळी ज्या ठिकाणी शिवसेनाप्रमुखांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला त्या ठिकाणी एक लहानसा स्मृतिस्तंभ उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंर्त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. सीआरझेड वा तत्सम कायद्याच्या कचाटय़ातून या स्मृतिस्तंभासाठी कशी मदत करता येईल ते सरकार पाहणार आहे. त्यामुळे स्मारकाचा वाद न चिघळता सन्मानजनक तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे जाणकारांनी सागितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS