मुंबई / अजेयकुमार जाधव / http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website )
गोरेगांव सिद्धार्थ नगर येथील पत्रावाला चाळ येथे ४० एकरच्या भूखंडावर पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. खाजगी विकासा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात म्हाडाचे एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून या घोटाळ्याची चौकशी सीआयडी मार्फत करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे युवा संघटक दिलीप गायकवाड यांनी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिद्धार्थ नगर येथील ४० एकराच्या भूखंडावर पुनर्विकास प्रक्रिया राबविण्यासाठी "गुरु आशिष" या विकासकाबरोबर सामंजस्य करार व समझोता झाला होता. या विकासकाने कराराचा भंग करत स्वतःचे हक्क म्हाडा, मुंबई मंडळ व म्हाडाचे उपाध्यक्ष सतीश गवई यांच्याशी संगनमत करून दिवाण बिल्डर्सच्या एचडीआयएल कंपनीला विकले आहेत. या पुनर्वसन प्रकल्पाच्या करण्यात आलेल्या ऑडीट मध्ये म्हाडाचे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
म्हाडाचे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असतानाही म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश गवई मात्र कोणतेही नुकसान झाले नसल्याचे, घोटाळा झाला नसल्याचे सांगत आहेत. तर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्वसन मंडळाचे सभापती प्रसाद लाड यामध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप करत आहेत. सभापती व उपाध्यक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य काय आहे ते लोकांसमोर येण्याची गरज आहे.
यामुळे या घोटाळ्याची चौकशी पूर्ण होई पर्यंत मुंबई दुरुस्ती मंडळाचे सभापती प्रसाद लाड व म्हाडाचे उपाध्यक्ष सतीश गवई यांना पदावरून हटवण्यात यावे. तसेच एक हजार कोटीं रुपयांचा घोटाळा झाला कि नाही, झाला असल्यास तो कसा झाला, त्यामध्ये कोणाचा सहभाग होता याची चौकशी होणे गरजेचे असल्याने या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाही करावी अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.


No comments:
Post a Comment