| मुंबई : जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने (१४ नोव्हेंबर) मुंबई मनपाने सामाजिक संस्थांच्या संयुक्त सहकार्याने राबवलेल्या मधुमेह विरोधी मोहिमेला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मधुमेह तपासणीसाठी ३५0 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील तपासणी केंद्रे उभारण्यात आली होती. या तपासणी केंद्रांवर मुंबईकरांनी अक्षरश: रांग लावून आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून घेतले. दिवसभरात सुमारे २ लाख मुंबईकरांनी अत्याधुनिक उपकरणाच्या सहाय्याने मधुमेह तपासणी करून घेतली. आजच्या धावपळीच्या जगात व विशेषत: शहरी भागातील गतिशील व तणावपूर्ण जीवनशैलीमुळे मधुमेहाचा धोका वाढतो आहे आणि मधुमेह हे अनेक रोगांचे मूळ आहे. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेने मधुमेहाच्या विरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. सार्वजनिक-खाजगी उपक्रमातून भारतात प्रथमच असा उपक्रम राबवला जात असून वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य औषधोपचार, योग्य आहार व योग्य व्यायाम याबाबत सातत्य ठेवल्यास मधुमेहाला आळा घालणे किंवा र्मयादेत ठेवणे शक्य आहे, हे लक्षात घेऊन सर्वस्तरीय जनजागृती होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे ही मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे प्रतिपादन महापौर प्रभू यांनी केले आहे. मधुमेह चाचणीद्वारे साधारणत: १0 ते १२ हजार संभाव्य रुग्ण समोर येतील, असा अंदाज आहे. तसेच पुढील वर्षी ५ लाख नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्टदेखील निश्चित करण्यात आले असल्याचेही महापौरांनी सांगितले. तथापि, मधुमेह तपासणीची संख्या वाढली तरी संभाव्य रुग्णांची संख्या कमी असणे हे या उपक्रमाचे आणि मधुमेह विरोधी मोहिमेचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे खर्या अर्थाने म्हणता येईल, असेही महापौर म्हणाले. मुंबईकरांच्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठी सतत कार्यरत असणार्या बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मधुमेह विरोधी मोहीम सातत्याने व अधिकाधिक गतिशीलतेने राबवण्यात येत आहे. जी/उत्तर विभाग, गोखले रोड आरोग्य केंद्र, माहीम प्रसूतिगृह आरोग्य केंद्र व शिवाजी पार्क परिसर या ४ ठिकाणी सुरू असलेल्या मधुमेह चाचणी केंद्राला भेट देऊन महापौरांनी उपस्थित नागरिकांशी समन्वय साधला. बृहन्मुंबई महापालिका व कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांनी संयुक्तिक आयोजित केलेल्या शुभारंभ कार्यक्रमास अबॉट डायबिटीस केअर, जॉन्सन अँण्ड जॉन्सन मेडिकल इंडिया, अपोलो म्युनिक, सनोफी इंडिया यांचेही सहकार्य मिळाले आहे. |
Post Top Ad
14 November 2013
Home
Unlabelled
'मधुमेह'विरोधातील मोहिमेला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
'मधुमेह'विरोधातील मोहिमेला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment