मुंबई - 28 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई : पालिका शिक्षण विभागातील शिक्षकापासून मुख्याध्यापकांपर्यंत सर्वांनाच करारात ठरल्याप्रमाणे सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी व ग्रेड पे दिला गेला असला तरी शिक्षण विभागीतलच विशेषत: कनिष्ठ पर्यवेक्षक, स्काऊट-गाईडचे फिल्ड ऑर्गनायझर अशांना मात्र नवीन वेतन श्रेणीपासून वंचित ठेवण्यात आले होते. शिक्षक सभेचे नेते रमेश जोशी यांनी पालिका प्रशासनाबरोबर गेल्या काही महिन्यांपासून वाटाघाटी आणि चर्चा करून कनिष्ठ पर्यवेक्षकांपासून सर्वांनाच नवीन वेतन श्रेणी व ग्रेड पे मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे. तशा प्रकारचे स्पष्ट परिपत्रक पुढील आठवड्यात काढण्याचे सामान्य प्रशासनाने मान्य केल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला अन्याय थांबणार आहे.
१९ सप्टेंबर २0११ रोजी पालिका प्रशासन व कामगार संघटना यांमध्ये वेतन श्रेणी सुधारणा करार करण्यात आला. त्यानुसार, ३0 सप्टेंबर २0११ रोजी परिपत्रक काढून सुधारित वेतन आकारण्याचे निर्देश आले. पुढे पालिका प्राथनिक शिक्षकांच्या वेतन श्रेणीतील तफावतीबाबत चर्चा करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्या दालनात २१ जानेवारी २0१२ रोजी सभा आयोजित करून चर्चेअंती वेतन श्रेणीतील तफावती दूर करण्याचे प्रशासनाने मान्य केले. १६ मे २0१२ रोजी पालिकेतील निमवैद्यकीय व इतर प्रवर्गांतील कर्मचार्यांसाठी वेतन श्रेणी सुधारणा करण्याचे परिपत्रक काढण्यात आले; परंतु त्या परिपत्रकात शिक्षण विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षक इन्स्ट्रक्टर, फिल्ड ऑर्गनायझर, गाईड ट्रेनर, समाज विकास अधिकारी रिसर्च ऑफिसर, आर्टिस्ट, कँप वॉर्डन, प्राचार्य अशा एकूण १७ समकक्ष प्रवर्गांना कोणताही दिलासा देण्यास उल्लेख नसल्यामुळे आजपर्यंत त्यांच्या वेतन विसंगतीचा प्रश्न रेंगाळत पडला होता. त्यांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते. अखेर याबाबत शिक्षक सभेचे नेते रमेश जोशी यांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली आणि प्रशासनाशी पत्रव्यवहार, चर्चा सुरू के ल्याने त्याला यश आले. वरील प्रवर्गांसाठीच्या वेतन निश्चितीतील विसंगती दूर करून त्यांना कालबद्ध पदोन्नतीसह नवीन वेतन श्रेणी व ग्रेड पे देण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.


No comments:
Post a Comment