इंदू मिलच्या जागेचे श्रेय लाटण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 November 2013

इंदू मिलच्या जागेचे श्रेय लाटण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली

मुंबई - 27 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला इंदू मिलची जागा देण्यामागचे श्रेय उपटण्यासाठी आता सत्ताधारी आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचा विषय पक्षाच्या जाहीरनाम्यात होता याची जाणीव काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी करून देताच या विषयावर आम्हीच सर्वप्रथम आंदोलन पुकारले, असा दावा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी गेल्या ६ डिसेंबरला केंद्र सरकारने इंदू मिलची साडेबारा एकर जागा देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ही जागा महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात देण्यात यावी, असा आग्रह रिपब्लिकन नेते रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे आदींनी केला होता. ६ डिसेंबर म्हणजेच डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापूर्वी या जागेवर डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या नेत्यांनी दिला होता. सामाजिक समता मंच या संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय कांबळे यांनीही यासाठी आंदोलन केले होते. 

या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी इंदू मिलची जागा महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय होताच मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी इंदू मिलची साडेबारा एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी देण्याचे आश्‍वासन काँग्रेसने पूर्ण केल्याचे जाहीर केले. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात हा विषय होता. ते वचन आम्ही पूर्ण केले. राज्य सरकार आता जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून लवकरच तेथे भूमिपूजन करील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष आव्हाड यांनी या जागेसाठी विजय कांबळे यांनी सर्वप्रथम आंदोलन सुरू केल्याचे सांगितले. या स्मारकाचे श्रेय राष्ट्रवादीला मिळत असेल तर माणिकरावांच्या पोटात दुखण्याचे काहीच कारण नाही, असेही ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भरसमुद्रातील स्मारकाबाबत विचारले असता माणिकराव म्हणाले की, राज्य शासनाने याकरिता जागा निश्‍चित केली आहे. आपणही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. काँग्रेस व सरकार यांची स्मारकाबाबत एकच भूमिका आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा विषय हा शिवसेनेचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली असेल तर त्यावर आपण काही बोलणार नाही. पवार अनेकांना मदत करतात, अशी टिप्पणी त्यांनी केली

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS