मुंबई-राज्यात २०१२ मध्ये विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सहा हजार ६३० अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्व मुलांची पार्श्वभूमी पाहता त्यांची शैक्षणिक व आíथक परिस्थिती फारच वाईट असलेल्या मुलांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. धक्कादायक म्हणजे ताब्यात घेण्यात आलेल्या ५० टक्क्यांहून अधिक मुलांच्या कुटुंबांचे मासिक उत्पन्न सुमारे दोन हजार किंवा त्यापेक्षाही कमी आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, २०१२ मध्ये अल्पवयीन मुलांविरोधात विविध कलमांतर्गत चार हजार ५७० गुन्हे, तर विशेष व स्थानिक कायद्यांतर्गत ३१६ असे एकूण चार हजार ८८६ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात भादंवि कलमांतर्गत सहा हजार २१८ व विशेष, स्थानिक कायद्यांतर्गत ४१२ अशा एकूण ६ हजार ६३० अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी दोन हजार ७७४ मुलांनी प्राथमिक अथवा त्यापेक्षा कमी शिक्षण घेतलेले आहे.
त्याचप्रमाणे ताब्यात घेण्यात आलेल्या एकूण अल्पवयीन मुलांपैकी सर्वाधिक म्हणजेच ५८.८२ टक्के मुलांच्या कुटुंबांचे वार्षकि उत्पन्न २५ हजार अथवा त्याहून कमी असल्याचे आढळून आले आहे. म्हणजेच गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांपैकी ५० टक्क्यांहून अधिक मुलांचे मासिक उत्पन्न दोन हजार अथवा त्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे अनेक मुले घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे गुन्हेगारीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यातही विविध गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेल्या सहा हजार ६३० मुलांपैकी ४६३ मुले अशिक्षित आहेत, तर दोन हजार ३११ मुलांनी फक्त प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे शैक्षणिक मागासलेपणही या मुलांच्या गुन्हेगारीचे प्रमुख कारण असल्याचे दिसून येते.
| वर्ष | एकूण गुन्हे | अल्पवयीन मुलांविरोधातील गुन्हे |
| २००२ | १,६५,४६२ | ३, १२८ |
| २००३ | १,६४,३०६ | ३,२४६ |
| २००४ | १,७६,३०२ | ३, ६५१ |
| २००५ | १,८७,०२७ | ४, २१६ |
| २००६ | १,९१,७८८ | ४,२४९ |
| २००७ | १,९५,७०७ | ४,४९९ |
| २००८ | २,०६,२६३ | ४, ५९७ |
| २००९ | १,९९,५९८ | ४, ६२२ |
| २०१० | २,०८,१६८ | ४, ३१५ |
| २०११ | २,०४,९०२ | ४,७७५ |
| २०१२ | २,०२,७०० | ४,५७० |
ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांच्या आर्थिक स्थितीप्रमाणे टक्केवारी
| उत्पन्न गट | (प्रति वर्ष) | ||||
| २००८ | २००९ | २०१० | २०११ | २०१२ | |
| २५ हजार पर्यंत | ६४.४५ | ६७.६ | ६५.५३ | ५७.३ | ५८.८२ |
| २५ हजार ते ५० हजार | २३.०८ | १७.२७ | १९.६३ | २६.२९ | २२.२८ |
| ५० हजार ते एक लाख | ९.३२ | ९.२५ | ९.४४ | १०.०३ | १२.७८ |
| एक लाख ते दोन लाख | १.४१ | ३.८३ | ३.३३ | ४.६७ | ४.०७ |
| दोन लाखांच्या वर | १.७४ | २.०५ | २.०७ | १.७१ | २.०५ |


No comments:
Post a Comment