मुंबई : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यात नागपूर येथे सुरू होत आहे. या अधिवेशनाचा कालावधी सध्या दोन आठवड्यांचा ठरला आहे. विदर्भाला अधिक न्याय द्यायचा असेल तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी चार आठवड्यांचा करावा, अशी आग्रही मागणी शिवसेना-भाजपा आणि मनसेने केली आहे. विधिमंडळाच्या बुधवारी पार पडलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही मागणी केल्याची माहिती शिवसेना विधिमंडळ गटनेते सुभाष देसाई, भाजपाचे मुख्य प्रतोद गिरीश बापट आणि मनसे गटनेते बाळा नांदगावकर यांनी दिली. विधानभवनात ते पत्रकारांशी बोलत होते.
अधिवेशनाचा कालावधी चार आठवड्यांचा करण्यात यावा, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केल्याचे सांगून गिरीश बापट म्हणाले, विदर्भातील प्रश्न मोठे आहेत. विदर्भाचा अनुशेष, अतवृष्टी, गारपीट तसेच पंतप्रधान पॅकेजचा फायदा अद्याप न मिळणे आदी अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी २ आठवड्यांचा कालावधी पुरेसा नाही. विरोधी पक्षाला चर्चेसाठी पुरेसा वेळ हवा आहे.


No comments:
Post a Comment