विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांचे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 November 2013

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांचे

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ९ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होत असून ते दोन आठवड्यांचे असेल, असे राज्याचे संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. जादूटोणाविरोधी विधेयकासह १२ विधेयके अधिवेशनात मांडली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विधानभवनात बुधवारी विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत अधिवेशनातील कामकाज निश्‍चित करण्यात आले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे वगळता समितीचे सर्व सदस्य या बैठकीला उपस्थित होते. आमदार सुभाष झनक यांच्या तसेच इतर आजी-माजी सदस्यांच्या मृत्यूबद्दल शोकप्रस्ताव मांडून या कामकाजाला सुरुवात होईल. याच दिवशी जादूटोणाविरोधी विधेयक, एम.आर.टी.पी. तसेच महसूलविषयक विषयाचे विधेयक मांडले जाईल. २0१३-२0१४ च्या पुरवण्या मागण्या तसेच २0६-२00७ व २00७-२00८ या काळातील अतिरिक्त खर्चाच्या मागण्याही यादिवशी सादर होतील. दुसर्‍या दिवशी म्हणजेच मंगळवारी सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव मांडला जाईल. याच दिवशी भारतरत्न मिळाल्याबद्दल सचिन तेंडुलकर तसेच शास्त्रज्ञ डॉ. राव यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला जाईल. महागाई आणि वीज खात्यातील भ्रष्टाचाराच्या विषयावर विरोधी पक्षांकडून मांडला जाणारा प्रस्ताव गुरुवारी येण्याची शक्यता आहे. मागील अधिवेशनात प्रलंबित राहिलेली अशासकीय कामकाजातील विधेयके शुक्रवारी चर्चेला येतील. १६ व १७ डिसेंबरला पुरवण्या मागण्यांवर चर्चा होईल. १९ डिसेंबरला विरोधी पक्षांकडून अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाईल आणि २0 डिसेंबरला अधिवेशन संपेल, असे पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS