मुंबई : कर्मचारी तसेच श्रमिकांनी कामावर उशिरा येण्याबाबत भारतीय कंपन्या कडक धोरण स्वीकारतात, असे एका पाहणीत आढळून आले आहे. भारतातील ४२ टक्के कंपन्यांनी उशिरा कार्यालयात येणार्या 'लेट लतिफ' कर्मचार्यांपैकी कमीत कमी एका कर्मचार्याला काढून टाकले असून अशी कारवाई करणार्या देशांमध्ये भारत आघाडीवर आहे.
'करियर बिल्डर' या फर्मने नऊ देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणामधून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या पाहणीनुसार भारतामधील ४२ टक्के कंपन्यांनी उशिरा येणार्या कर्मचार्यांना काढून टाकले आहे. अशाच प्रकारची कारवाई करणार्या देशांमध्ये ब्राझील दुसर्या स्थानावर आहे. ब्राझीलमध्ये २६ टक्के कंपन्यांनी उशिरा कामावर येणार्या कर्मचार्यांना कामावरून कमी केले आहे. फ्रान्स आणि रशिया हे दोन देश याबाबतीत २२ टक्क्यांसह संयुक्तपणे तिसर्या स्थानावर आहेत, तर ब्रिटन याबाबतीत चौथ्या स्थानावर आहे. ब्रिटनमधील २१ टक्के कंपन्यांनी उशिरा कामावर येणार्या कर्मचार्यांना काढून टाकल्याचे दिसून आले आहे. चीनचा पाचवा क्रमांक (२0 टक्के) लागत असून त्यानंतर र्जमनी (९ टक्के), जपान (७ टक्के), इटली (६ टक्के) या देशांचा क्रमांक लागतो. या पाहणीनुसार कर्मचारी कामावर उशिरा पोहोचलेले कंपन्यांना आवडत नाही. परंतु वाहतुकीतील खोळंबा, जोरदार पाऊस आदी कारणांमुळेही कर्मचारी कामाच्या ठिकाणी उशिरा पोहचतात. अशा प्रसंगी वेळेवर कामावर पोहोचणे त्यांच्या हातात नसते. अशा प्रसंगी कंपन्यांकडून कारवाई केली जात नाही, ते परिस्थिती समजतात. मात्र 'लेट लतिफ' असा शिक्का बसलेल्या कर्मचार्यांच्या बाबतीत अन्य वेळी कामावर येण्यास उशीर झाला आणि त्याने दिलेली कारणे पटली नाहीत तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जात असल्याचे दिसून आले आहे.


No comments:
Post a Comment