मुंबई - 26 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई : मराठी रंगभूमीवरील काही कलावंतांनी येत्या हिवाळी अधिवेशनात मंजुरीसाठी येणार्या जादूटोणाविरोधी कायद्याला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात जादूटोणाविरोधी कायद्याला मंजुरी मिळावी, अशी मागणी करून आपल्या तीव्र भावना व्यक्त करणारे एक पत्रच मराठी कलावंतांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लिहिले आहे.डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला तब्बल १00 दिवस उलटले तरीदेखील त्यांचे मारेकरी आणि या हल्ल्यामागच्या मास्टरमाईंडला गजाआड करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. याबाबतही संतापाची भावना या मराठी कलावंतांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. याबाबत आपल्या भावना अत्यंत तीव्र असल्याचे या कलावंतांनी पत्रात म्हटले असून आसारामी तसेच नथुरामी अशा प्रवृत्तींना आपल्या आधुनिक पुरोगामी समाजात जागाच असता कामा नये, अशा जहाल शब्दांत या मराठी कलावंतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जादूटोणाविरोधी कायद्याला सर्वच स्तरांतून अनेकांनी मोठय़ा प्रमाणावर विरोध केला, मात्र हा कायदा योग्यच असून तो मंजूर करून घेण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकरांसारख्या लढवय्या माणसाला आपले प्राण गमवावे लागले. मात्र, आता त्यांच्यानंतर अनेक जण त्यांचा लढा सुरू ठेवण्यासाठी उभे राहिले आहेत. मराठी कलावंतांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत लिहिलेले पत्र हे त्याचेच द्योतक असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पत्रावर अभिनेते स्वप्निल जोशी, संदीप मेहता, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, निर्माते दिलीप जाधव तसेच शशिकांत पवार, हर्षदा शिंदे, जयदीप शिंदे या कलावंतांच्या स्वाक्षर्या आहेत. दरम्यान, २ डिसेंबर रोजी राणीबाग भायखळा येथून आझाद मैदानाकडे निघणार्या मोर्चामध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची कन्या मुक्ता दाभोळकर मराठी कलावंतांसह सहभागी होणार आहे.


No comments:
Post a Comment