बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला भारिपचा कायम विरोध राहणार- प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 November 2013

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला भारिपचा कायम विरोध राहणार- प्रकाश आंबेडकर

मुंबई - 30 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com

विघटनवादी, प्रांतवादी व अन्य जाती -धर्मीयांचा विरोध करणा-या नेत्याचे स्मारक झाल्यास जनमानसात चुकीचा संदेश जाईल, असे सांगत भारिप बहुजन महासंघाचे राष्‍ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला आपला कायम विरोध असल्याची घोषणा केली. या वेळी त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार कॉँग्रेसवर दबाव आणण्यासाठीच स्मारकासाठी पुढाकार घेत असल्याची टीकाही केली.

 
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते नंदुरबारला आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. देशात स्मारकावरून राजकारण केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास आपला विरोध नाही, असे नमूद करून ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला मात्र आपला कायम विरोध असेल. बाळासाहेब  दलित व मुस्लिमविरोधी नेते होते. त्यामुळे अशा नेत्याचे स्मारक कधीही बांधण्यात येऊ नये. अशा बाबींमुळे केवळ राजकारणी लोक आपला स्वार्थ साधतात. ऊस प्रश्नावर त्यांनी आपले मत मांडताना सांगितले की, राजू शेट्टी ऊस दरवाढीसाठी आंदोलन करत आहेत. मात्र, राज्यातील सहकारी साखर कारखाने खासगी लोकांच्या ताब्यात गेले तेव्हा त्यांनी त्याला विरोध का केला नाही? तेव्हा आंदोलन का करण्यात आले नाही? साखर कारखाने खासगी लोकांच्या ताब्यात असतील तर भाव ठरवण्याचा अधिकार शासनाला कसा असेल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सिंचनात 72 हजार कोटी रुपयांचा तर आदिवासी निधीत आठ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. मात्र, या प्रकरणाची चौकशीच झाली नाही. विदर्भात अतिवृष्टी झाली, परंतु तिथल्या शेतक-यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. दुष्काळाचे धोरण हे ब्रिटिश काळापासूनच चालत आहे. ओल्या दुष्काळासाठी खास तरतूद नाही. शासनाने धोरणात बदल केला पाहिजे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, आंबेडकरांच्या या भूमिकेमुळे आता रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले काय बोलतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

ओबीसीत समावेश नको
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, मात्र त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये. पूर्वी आरक्षण मिळाल्यास सरकारी जावई म्हटले जात होते. आता अनेक समाज, जाती आरक्षण घेण्यास पुढे येत आहेत. याचाच अर्थ ते सरकारी जावई होण्यास इच्छुक आहेत, असा टोलाही आंबेडकर यांनी हाणला.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS